अफगानिस्तानच्या काबुलजवळच्या खेड्यात त्या मातेची ३ मुलं दगावली. चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवर्याला म्हणाली, इथलं वातावरण काही बरं नाही, आपण हा देश सोडून जाऊया. नवरा बायको अन ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले. सरतेशेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुर्यात वास्तव्य जिथे दारूडे, चोरटे, बदफैली, दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय, दरोडे, खून होत अशा वातावरणात हे कुटुंब कसेतरी आपले दिवस ढकलंत होतं, या अशा परिस्थितीत नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली. याचा शेवट तलाकने झाला, या छोट्या बाळाच्या मनावर काय परिणाम होत असेल कल्पना करा..
तरूण पठाणी स्रीला अशा गढूळ वस्तीत एकटं टिकणं अवघड होतं, पाकिस्तानातून तिचे आई आणि भाऊ आले, आणि त्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. त्या कमनशिबी मुलानं आईचं दुसरं लग्न बघितलं, पण नशिबाचे भोग त्याहून वाईट होते. त्या छोट्या बाळाचा सावत्र बाप दमडी कमवत नव्हता. त्या छोट्या मुलाला तो त्याच्या पहिल्या बापाकडे पैसे मागायला पाठवायचा. तो छोटा मुलगा कामाठीपुर्यापासून ३ किमी बापाकडे चालत जात एका दोन रुपयाची भिक मागायचा, त्याचे वडिल म्हणायचे “बेटे मै कहा से पैसे दुं, मै खुद मस्जिद मे पेशेमाम हुं,” पण कुठूनतरी ते दोन रुपये उसने घेऊन त्या मुलाला परत पाठवत, त्या दोन रुपयाच पीठ, डाळ विकत घेऊन आठवड्यात ३ दिवस जेवायचं आणि ४ दिवस उपाशी राहायचं. (motivational stories in marathi).
या हालाखीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं ५व्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं. घराबाहेर पडणार्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला. ती म्हणाली, “मै जानती हुं तू कहा जा रहा है, तू तीन चार रूपये कमाने जा रहा है, ताकी घर की गरीबी ना रहे, तेरे घर मे मुफलिसी ना रहे, भुक ना रहे, लेकिन बेटा इस गरीबी से टकराने के लिए मै हुं, तू एक काम कर तू सिर्फ पढ़़ ”
आईचं ते शब्द त्या मुलानं लक्षात ठेवले, आणि डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्याच्या हाल अपेष्टांनी या मुलाला जीवनाचं सार कळलं. आजूबाजूची लोकं बघून तो लिहू लागला, नक्कल करू लागला. दिवसभरात सुचलेलं कागदावर उतरवून ते घराजवळच्या कबरस्तानमध्ये जाऊन मोठ्यानं वाचू लागला.
एके रात्री असंच अचानक त्या मुलाच्या चेहर्यावर कोणीतरी टॉर्च चमकवली, त्याला बोलावत विचारलं की “तू काय करतोस”, मुलगा म्हणाला “मी हे स्वतः लिहितो आणि इथे वाचत बसतो”, समोरच्या व्यक्तीनं विचारलं “ड्रामा मे काम करते हो क्या?” तो मुलगा म्हणाला, “ड्रामा म्हणजे काय?” त्या व्यक्तीनं त्या मुलाला बंगल्यावर बोलवून त्याला २०० रुपये दिले आणि आशीर्वाद दिला, “की या २०० रुपयांचे उद्या २ लाख , दोन कोटी होतील, आणि झालंही तसंच”
ज्या मुलाच्या आयुष्याचा अंधार अंगावर काटा उभा करतो, बदनशिबीपणा आपल्याला कावरंबावरं करून सोडते, भुक, गरीबी, लाचारीचं हे जगणं आपण खचितच कुठे पाहिलं असेल, ऐकलं असेल. पण हा संघर्ष तुडवत नशिबाला लोळवत तो पुढे गेला. आपल्या आईचं दुःख तो लिहीत गेला. त्याच सच्चेपणातून हा लेखक घडला आणि त्याच सच्च्या संवादांनी त्याला महान अभिनेता बनवलं.. ते होते कादर खान साहेब..
ज्याचं जगणं हीच प्रेरणा होती.
भावपूर्ण श्रद्धांजली.
(motivational stories in marathi).