गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर म्हणजे रत्नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी खुप पर्यटक येथे भेट देतात.
गणपतीपुळे हे मंदिर कोंकण विभागात आढळते. या विभागात मराठी ही बोली भाषा बोलली जाते. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ(M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे.
सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे मंदिर आगळेवेगळे दिसते . गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकइत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळेचा इतिहास :
कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. “आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन”, असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.
खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली.
गणपतीपुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
एकूण बागायती जमीन: २०.५१
लागवडीयोग्य पडीक जमीन: २४.४३
बिगरशेती वापरात असलेली जमीन: २४.६४
ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ११९.५६
कायमस्वरूपी पडीक जमीन: ५६.२५
पिकांखालची जमीन: २०.५१
फुटकळ झाडीखालची जमीन: १४.९३
सद्यस्थितीतील पडीक जमीन: १४.३२