Information Of Buddha In Marathi | बुद्ध पौर्णिमा | Buddha Pournima

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, ती कारणे म्हणजे… याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या
चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत,नेपाळ,
म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया,
मलेशिया,  इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबिरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताक्यांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.
श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस ‘वेसक’ उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा ‘वैशाख’ शब्दाचा अपभ्रंश आहे.

• या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.

• बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.

• बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते. आणि दिवा लावून पूजा केली जाते.

• बोधिवृक्षाची पूजा केली जाते.

• त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताक्यांनी सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.

• या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.

• पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करुन खुल्या आकाशात सोडले जाते.

• गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.

• बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात.

भारतातील बुद्ध जयंतीचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी,  भिक्षू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.

‘इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.’ अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला होता.

भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्रोत म्हणजे गौतम बुद्ध, या शब्दांत थोर विचारवंत शरद पाटील यांनी बुद्धाची महती वर्णिली आहे, तर दुसरे एक प्रख्यात विचारवंत आ. ह. साळुंके यांनी बुद्धाला सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधले आहे.

बुद्ध जयंतीचे महत्त्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली. दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.

बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य
चार आर्यसत्य आचरणात आणल्यास माणूस त्याचं जीवन आनंदात घालवू शकतो. ती सत्य म्हणजे…
> दु:ख असते.
> दु:खाला कारण असते.
> दु:खाचे निवारण करता येते.
> दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत.

बुद्धांनी आठ मार्ग सांगितले

दु:ख निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले होते.
> यम
> नियम
> आसन
> प्राणायाम
> प्रत्याहार
> ध्यान
> धारणा
> समाधी

बुद्धांच्या जन्माची कहाणी

वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. खाली उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजा शुद्धोधनाच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून अपत्यजन्माची घटना घडलेली नव्हती. या बालकाच्या आगमनाने सर्व अर्थ सिद्ध झाले म्हणून बाळाला ‘सिद्धार्थ’ हे नाव देण्यात आले. अखिल मानवजातीचे, पशू-पक्ष्यांचे, कीटक-पतंगाचे आणि सर्व चराचरांचा कल्याण करणारा भगवान तथागत, सम्यक सम्बुद्ध, महाकरुणिक, महानुकंपाय, अरिहंत जन्माला आल्याच्या या दिवशी ‘बुद्ध जयंती’ साजरी केली जाते. कपिलवस्तू व देवदह यांच्यामधल्या नेपाळ तराईच्या अरण्यामध्ये लुम्बिनी नामक अतिशय सुंदर वनात उगवत्या सूर्याच्या साक्षीने तथागत जन्माला आले.

ज्या क्षणाला लुम्बिनी वनात राजकुमार सिद्धार्थ जन्माला आले, त्याच क्षणी अन्य काही जणांचाही जन्म जम्बु द्विपात झाला. कपिलवस्तूनगरीच्या शेजारील रामनगर राज्यात कोलीय राजा दंडपाणीच्या राजमहालात एका देखण्या कन्येने जन्म घेतला. ही राजकन्या म्हणजे यशोधरा. सिद्धार्थ आणि यशोधरा हे समवयस्क होते. यशोधरा म्हणजे महान यश प्राप्त करणारी! गया येथील बोधिवृक्षाचा जन्मही याच दिवसाचा. हाच कालुदायी नामक राजा शुद्धोधनाच्या अपत्याचाही जन्मदिवस होय. तथागताचा सर्वांत प्रिय शिष्य म्हणून विश्वविख्यात झालेल्या आनंदचा जन्मही वैशाखी पौर्णिमेलाच झाला. याशिवाय सिद्धार्थ गौतमाचा सारथी छन्न, राजपुत्र सिद्धार्थचा प्रिय घोडा कन्थक, अजानीय गजराज हेदेखील याच दिवशी जन्माला आले.

तत्कालीन परंपरेप्रमाणे राजा दंडपाणीने मुलीच्या लग्नासाठी स्वयंवर रचले होते. या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी सर्व देशांतल्या राजपुत्रांसमवेतच सिद्धार्थलाही आमंत्रित केले होते. प्रारंभी सिद्धार्थ या स्वयंवराला जाण्यास फारसा उत्सुक नव्हता. महाराणी प्रजापती गौतमीने समजूत घातल्यावर सिद्धार्थ तयार झाला. या स्वयंवरात सहभागी होऊन सिद्धार्थने अलौकिक कर्तृत्व गाजवले. स्वयंवरात एका रानटी घोड्याच्या पाठीवर स्वार होण्याची अट राजा दंडपाणीने घातली होती. हा घोडा अत्यंत हट्टी, रानटी व नाठाळ असल्याने कोणत्याही राजपुत्राला त्यास स्पर्श करण्याचे धैर्य झाले नाही. सिद्धार्थ मात्र या घोड्याच्या पाठीवर अगदी सहजपणे स्वार झाला. एवढेच नव्हे, तर त्याने त्याला सुतासारखा सरळही केला. यालाच अश्वलक्ष्यविद्या संबोधले जाते. याबरोबरच लीपिज्ञान, बाणविद्या, धनुर्विद्या, काव्य, व्याकरण, पुराण, इतिहास, वेद, ज्योतिष, सांख्य, वैशेषिक, स्त्रीलक्षण इ. कला आणि विद्यांमध्ये सिद्धार्थने आपले नैपुण्य सर्वांसमक्ष सिद्ध केले. या स्वयंवर मंडपातच सिद्धार्थ आणि यशोधरा मंगलपरिणयात बद्ध झाले.

सिद्धार्थ गौतम लुम्बिनीत जन्माला आला, तर भगवान बुद्धाचा जन्म बुद्धगयेत झाला, असे म्हंटले जाते. ही जागतिक महत्त्वाची पवित्र घटना होय. या आधीच्या तिन्ही घटनांना ऐतिहासिक महत्त्व आहे, यात शंका नाही. मात्र, ही चौथी घटना अखिल विश्वातल्या मानवजातीने अभिमान बाळगावा अशी आहे. फक्त मानवी समाजच नाही तर वन्यजीव, हिंस्त्र श्वापद, सूक्ष्म जीव, वनस्पती, सजीव-निर्जीव या साऱ्यांना मुक्तीच्या खरे म्हणजे कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागतांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेला अनमोल असे महत्त्व आहे. गौतमला सम्यक संबोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्यांचे व प्रतित्य समुत्पाद सिद्धान्ताचे ज्ञान झाले. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी सिद्धार्थ सम्यक सम्बुद्ध झाले!

वयाच्या ८० व्या वर्षी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाखी पौर्णिमा इ.स.पू. ४८३ मध्ये मल्ल देशातल्या कुशीनगर येथे शालवनात जोड्शाल वृक्षाखाली भगवन्ताना महानिर्वाणपद प्राप्त झाले. तथागतांनी अविश्रांतपणे ४५ वर्षे पवित्र धम्माचा प्रचार केला. बौद्ध धम्मात मुळातच असलेली उच्च कोटीची नीतितत्त्वे, सत्याचे स्वयंसिद्ध अधिष्ठान, उत्तम नैतिक शिक्षण आणि संपूर्ण सामाजिक गरजांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या उपकारक गुणवैशिष्ट्यांमुळे बौद्ध धम्माचा अत्यंत तीव्र गतीने जगभरात प्रसार झाला.

तथागतांच्या आयुष्यात वृक्षांचे खूप महत्त्व आहे. बालपणात कपिलवस्तूमध्ये जांभळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास ते करीत. देहक्लेशासारखी कठोर तपस्या त्यांनी वटवृक्षाखाली केली. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती बोधिवृक्षाखाली. याशिवाय आम्रपालीने भिक्खू संघास ‘आमराई’ दान केली. राजा बिंबिसार यांनी तथागतांना ‘वेळूवन’ दान केले. त्याचप्रमाणे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण दोन्ही प्रसंग शाल वृक्षाखालीच घडले. एकूणच बुद्धाच्या संपूर्ण आयुष्यात वैशाखी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्व विश्वाला कल्याणकारी ठरलेली आहे. म्हणूनच जगभरात वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून उत्साहात साजरी केली जाते.

तथागत गौतम बुद्धाच्या जीवनात वैशाखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण

Leave a Comment