कांदा गेला दीडशेच्या घरात…

गेल्या काही दिवसांपासून १२० रुपये किलोने विकला जाणारा कांदा सोमवारपासून ठाण्याच्या किरकोळ बाजारात तब्बल १५० रुपयांवर गेल्याने विक्रेत्यांबरोबर ग्राहकांच्याही डोळ्यांत अश्रूआले आहेत. कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने घराघरांत आणि सोशल मीडियावरही कांदा सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. ‘ अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाल्याने एरव्ही ३० ते ४० रुपये किलोने मिळणारा कांदा मध्यंतरी चक्क शंभरीच्यावर पोहोचला होता. सोमवारपासून किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखी वाढले. चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात येतच नसल्याची माहिती कांदा – बटाटे व्यापाऱ्यांनी लोकमतला दिली. जुना
कांदा जवळपास संपला असून पावसाळ्यानंतर लागवड करण्यात आलेला कांदा १५ जानेवारी २०२० नंतर बाजारात येईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. कांद्याचे दर खाली उतरतच नसल्याने ग्राहकांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. भाववाढीमुळे घराघरांत कांदा जपून वापरला जात आहे.
हॉटेलांमध्ये सॅलडमधून कांदा गायब . झाला आहे. अगदी आवश्यकतेपुरताच कांदा खरेदी केला जात असल्याचे महिला वर्गाने ‘सांगितले. एरव्ही किलोने विकला जाणारा कांद्याची खरेदी आता पाव किलोपर्यंत केली जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. २२ ऑक्टोबरपासून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो होता. चार ते पाच दिवसानंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढला आणि किरकोळ बाजारात ६० रुपये तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोने विक्री सुरु झाली. ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० रुपये आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो अशा दराने विकला जाऊ लागला. ४ नोव्हेंबरपासून कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच, नविन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. त्यानंतर हळुहळु १२० रुपये किलोवर पोहोचलेले कांद्याचे भाव १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

Leave a Comment