kokanachi kahi kaljala bhidnari mahati (कोकणी माणसांची काळजात भिडणारी माहिती )

शेकडो वर्षापूर्वी आपले पूर्वज या काेकणात आले ते सुरक्षिततेच्या कारणासाठी. कोकणातील दाट जंगल,भरपूर पर्जन्यमान, कडे कपारीच्या साथीने त्यानी आपले जीवन या नवख्या भूमीत नव्याने सुरू केले.कालांतराने आपण या कोकणात जन्म घेतला. कोकणातले जीवन जगणे हा प्रकार खूपच आनंददायी असतो.मात्र ते जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे व तशी संधी मिळालीच तर तिचा लाभ घेता आला पाहिजे. खाली  कोकणी जीवनातील काही वैशिष्ठ्यपूर्ण व आनंद.

सकाळच्या नाश्त्याला घावनं करताना लक्षात आले, की कोकणातले सगळे पदार्थ कमी साहित्य लागणारे आहेत.
कमी पिठात बरेच लोक खातील असेच पदार्थ आहेत बहुतेक. उदा. घावनं. यात कपभर पिठात तांब्याभर पाणी टाकलं की पंधरा वीस घावनं निघतात. कुळथाची पिठी-भात करायची तर एका मोठ्या चमचाभर पिठात असंच तांब्याभर पाणी ओतलं की सारं घर खाऊ शकतं.

कोकणी माणसाचे एकेकाळी मुख्य अन्न असलेल्या भाताच्या पेजेचीही तीच कथा. चार दाणे तांदुळाची गाडगाभर पेज. ती पिऊन कोकणी माणूस दुपारच्या मासळी-भातापर्यंत राबू शकतो.

केळीच्या पानातली पानगी घ्या कपभर पीठ नरम भिजवलं की पाच सात पातळ पानगी निघतात. सोलकढी घ्या एक नारळ अंगणातलाच वाटून त्यात पाणी आणि आगळ वाढवत जायचं शेवटचा माणूस जेवेपर्यंत.

कोकणी माणसाच्या काटकसरीचं , नेमकेपणाचं आणि नेटकेपणाचंही कारण असावं बहुधा.
अभावातून कसं पुरवायचं तेच यातून कळतं. म्हणूनच बहुधा कोकणी माणूस खायला प्यायला नाही म्हणून आत्महत्या करत नसावा.
तो अंगणातल्या एका फणसावर, एका आंब्यावर जगू शकतो. सकाळी नाश्त्यात, दुपारी जेवणात गरे खाऊन राहू शकतो. माशाच्या एका तुकड्याबरोबर नुसता भात खाऊन राहू शकतो.

शाकाहारी माणूस ताकभात खाऊन राहू शकतो.
अंगणातली केळफूलं, कच्चे फणस, फणसाच्या वर्षभर भरून ठेवलेल्या आठळ्या, दारातले भोपळे,अर्धी वाटी कडधान्ये भिजवून त्याच्या पातळ उसळी ह्या भाज्या त्याला तगवतात.

थोडक्यात कोकणी माणसाला भाकऱ्यांची चवड लागत नाही. विकतच्या भाज्या लागत नाहीत. तरी तो काटक असतो. आणि जगण्याला चिवट असतो.

आणि सगळेच सारखे असल्याने कोणी कोणाला हिणवण्याचा प्रश्न येत नाही. खोटा बडेजाव मिरवण्याचा प्रश्न येत नाही.

एक अनामिक कोकणी माणूस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *