कोकण रेल्वेची स्थापना कोणी आणि कशी झाली | Konkan Railway

Konkan Railway – पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे जिकीरीचे काम होते. पण मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या मंत्र्यांमुळे कोकण रेल्वे धावू लागली आणि तिचे रौप्यमहोत्सवी वर्षही सुरू झाले. त्यानिमित्ताने पंचवीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेचे आपले स्वप्न आपल्या हयातीत साकार झालेले आपणास पहावयास मिळेल, असे कोणाही कोकणवासियांस वाटले नव्हते. पण बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या समाजवादी नेत्यांच्या प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले.

कोकण रेल्वेच्या संकल्पनेचे जनक कोकणचे सुपुत्र कुडाळ तालुक्यातील वालावलचे रहिवासी कै. अ. ब. वालावलकर हे होत. त्यांनी कोकण रेल्वेची संकल्पना केवळ मांडलीच नाही, तर वर्तमानपत्रातून सातत्याने लेख लिहून आणि कोकण रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करून ती कोकणवासियांमध्ये रुजविली. तर भारताच्या पहिल्या लोकसभेत कोकण रेल्वेची मागणी करणारे पाहिले झाली त्या काळात रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून लोकसभेत निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड. मोरोपंत जोशी यांनी केले होते. 
१९५७ ते १९७० या कालावधीत सलग तीन वेळा राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांनी सातत्याने कोकण रेल्वेचा पाठपुरावा लोकसभेत चालविला होता. १९६९ साली काँग्रेसचे विभाजन होऊन जुन्या उजव्या विचारांच्या मंडळींनी संघटना काँग्रेस स्थापन केली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे सरकार लोकसभेत अल्पमतात गेले. या संधीचा फायदा घेऊन बॅ. नाथ पै यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, रेल्वेच्या अर्थसंकल्पात ‘कोकणात रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी तरतूद नाही.’ या कारणास्तव एक रुपयाची कपात सुचविली होती.

संसदीय प्रथेमध्ये एक रुपयाच्या कपात सूचनेला इतके महत्त्व आहे, की ती मंजूर झाल्यास तो सत्तारूढ पक्षाच्या मंत्रिमंडळावर अविश्वास मानला जाऊन मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो. परंतु संघटना काँग्रेसच्या खासदारांनी या कपात सूचनेवर तटस्थता स्वीकारल्याने ही कपात सूचना नामंजूर झाली. धूर्त इंदिरा गांधी या घटनेने सावध झाल्या. त्यांनी बॅ. नाथ पै यांना तात्काळ बोलावून त्यांचा विचार काय आहे, हे जाणून घेतले आणि तात्काळ कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. 

कोकण रेल्वेची स्थापना कोणी आणि कशी झाली
कोकण रेल्वेची स्थापना कोणी आणि कशी झाली


मात्र काँग्रेसच्या राजवटीत कोकण रेल्वे आपट्यात अडकून पडली. पुढे १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे पहिले बिगरकाँग्रेस मंत्रिमंडळ केंद्रात सत्तेवर आले आणि प्रा. मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले. रेल्वेमंत्री या नात्याने त्यांनी लोकसभेला सादर केलेल्या रेल्वेच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आपट्यात अडकून पडलेली कोकण रेल्वे पुढे मार्गस्थ केली.

१९८० साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे मंत्रिमंडळ अल्पमतात गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर इंदिरा गांधी बहुमत मिळवून पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. १९८० ते १९९० सलग दहा वर्षे केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर होते. रोह्यापर्यंत आलेली कोकण रेल्वे पुढे नेण्याची संधी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की या दहा वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वे रोह्याच्या पुढे एक इंचही पुढे सरकली नाही. त्यासाठी केंद्रात परत बिगरकाँग्रेस सरकारच यावे लागले.

१९९० साली विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बिगरकाँग्रेस मंत्रिमंडळात राजापूर मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेलेले प्रा. दंडवते अर्थमंत्री, तर दुसरे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडीस रेल्वेमंत्री झाले. 
कोकण रेल्वे उभारणीत अडचणीही होत्या. एक तर कोकण रेल्वेचे सुरू केलेले काम सरकार बदलले तरी बंद पडता नये अशी दक्षता घेणे आवश्यक होते. दुसरे, काम समयबद्ध कालावधीत पूर्ण करणे आवश्यक होते आणि ​तिसरे, त्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उभा करणे आवश्यक होते. या समस्या सोड​विण्यासाठी कोकण रेल्वेची लाभार्थी राज्ये, म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांच्या सहकार्याने ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन’ या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय फर्नांडिस आणि दंडवते यांनी घेतला.

रेल्वेउभारणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी कर्जरोखे काढण्यात आले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला, त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्प समयबद्ध कालावधीत पूर्ण करणे शक्य झाले. अनुभवी अभियंता ई. श्रीधरन यांची कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. समयबद्ध कालावधीत रेल्वेचे काम पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी सहा ठिकाणांहून दुबाजूने काम सुरू करण्यात आले. परंतु मार्गाला विरोध असणाऱ्या गोव्यातील खासगी मोटर मालकांच्या लॉबीने गोव्यात कोकण रेल्वेच्या कामात अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे कोकण रेल्वे काम पूर्ण होण्यास पाचऐवजी सहा वर्षे लागली. 

मुकुंदराव किर्लोस्कर यांनी ‘कोकण रेल्वे हा रेल्वेच्या इतिहासातील एक चमत्कार आहे’ असे प्रतिपादन केले आहे. खरोखरच हा एक चमत्कारच आहे, याचे कारण पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे त्या प्रदेशातील उंच-सखलपणा आणि खाड्या यामुळे जिकरीचे काम होते. सुमारे दहा टक्के मार्ग बोगद्यातून जातो. सर्वात मोठा साडेसहा कि. मी. लांबीचा बोगदा रत्नागिरी-संगमेश्वर रेल्वेमार्गावर ‘करबुडे’ येथे आहे, तर सर्वात उंच ६५ मीटर उंचीचा पूल रत्नागिरीजवळ ‘पानवल’ येथे आहे. रेल्वेचे स्वप्न साकार झाले खरे, पण कोकण रेल्वेचा खरा लाभ आज गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्याला मिळत आहे.

कोकणकन्येबरोबरच इतर गाड्यांचे डबे वाढवणे गरजेचे आहे. जादा गाड्यांचे रिझर्वेशन तीन मिनिटांत संपुष्टात कसे येते हा संशोधनाचा विषय आहे. कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर नागरी सुविधा वाढविणे, तसेच दिल्ली आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देणे आवश्यक आहे.

Leave a Comment