अनुक्रमाणिक
Short Story In Marathi -: गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’ तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.
Short Story In Marathi -: सागवानाचा वृक्ष आणि कांटेझाड
एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठा सागवानाचा वृक्ष उंच आणि सरळ वाढला होता तो नित्य आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्याखाली रुजलेल्या लहानसहान झुडपांचा धिक्कार करीत असे. त्या झुडपांमध्ये एक कांटेझाड होते, त्यास त्या सागवानाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्यामुळे त्याने त्यास एके दिवशी स्पष्ट विचारले, ‘बाबा, तू एवढा गर्व कशासाठी वाहतोस ?’ म्हणाला, ‘मी सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ आणि शोभिवंत आहे. माझा माथा मेघमंडळास भेदून गेला आहे, माझ्या फांदया सतत हिरव्या टवटवीत असतात.
आणि तुम्ही तर इतकी नीच आणि क्षुद्र आहात की, जो येईल त्याने तुम्हांस खुशाल पायाखाली तुडवावे. माझ्या पानांवरून जो पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहतो, त्यानेच तुम्ही बुडून जाता.’ हे ऐकून कांटेझाड म्हणाले, ‘ते सर्व असो, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो ती लक्षांत ठेव. जेव्हां एखादा लाकूडतोडया तुझ्या बुंध्यावर कुऱ्हाडीचा घाव घालावयास येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडाच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करावयास मोठया संतोपाने तयार होशील.’
तात्पर्य: मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, तशी लहानपणाच्या मागे नसतात. यासाठी मोठयांनी लहानांचा तिरस्कार करावा, हे अप्रशस्त होय.
Short Story In Marathi -: उंदीर खेडयातला व शहरातला
एक साधा भोळा खेडयातला उंदीर होता, त्याचे घरी एक धष्टपुष्ट आणि गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेडयातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरात असलेले पदार्थ, जवळच्या शेतातील काही कोवळ्या कोवळ्या गव्हाच्या लोंब्या, वाटाण्याच्या शेंगा व काही भाकरीचे तुकडे त्याने त्याजपुढे ठेविले. पण हे खेडयातले अन्न त्या शहरातल्या उंदरास आवडले नाही. मग तो त्या खेडवळ उंदरास म्हणतो, ‘काका, तुम्हास राग येणार नाही तर मी अंमळ मन मोकळे करून बोलणार आहे.
अहो, असल्या ह्या कंटाळवाण्या जागेत तुम्ही राहता तरी कसे ? हे अरण्य, तेथे आसपास गवत, झाडे, डोंगर, पाण्याचे ओहोळ याशिवाय दुसरे काही दृष्टीस पडत नाही. येथील पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा मनुष्यांचा शब्द बरा नव्हे काय ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी नव्हे काय ? तर याचा विचार करा आणि ही जागा सोडून मजबरोबर नगरात चला. तेथे तुम्हास फार सुख होईल. ’ ह्या त्याच्या बढाईच्या गोष्टी ऐकून त्या म्हातार्या उंदरास मोह पडला, मग ते उभयंता तेथून निघाले. ते रात्रौ शहरात जाऊन पोचले.
पुढे जात आहेत, तो त्यांनी एक मोठा वाडा पाहिला. तेथे अगोदरच्या दिवशीच लग्नाचा समारंभ झाला होता. त्या वाडयाच्या आत जाऊन ते स्वयंपाकघरात शिरले. तेथे नानाप्रकारचे पदार्थ भरले होते, आणि मनुष्य तर कोणी नव्हते. हे पाहून खेडवळ उंदरास मोठा आनंद झाला. मग शहरातला उंदीर त्यास म्हणतो, ‘काका, तुम्ही खोलीच्या मध्यभागी बसा आणि मी एक एक पदार्थ देईन, तो चाखून पाहून त्याची रूचि कशी काय आहे, ते मला सांगा. ’ मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्यास देऊ लागला, तो चाखून ‘अहाहा ! काय मिष्ट पदार्थ आहे हा !’ असे म्हणून तो खेडवळ उंदीर त्याची तारीफ करू लागला.
याप्रमाणे त्यांनी एक घटकाभर आपला काळ मोठया आनंदाने घालविला. इतक्यात तिकडून कोणी स्वयंपाकघराचे दार उघडू लागला, ते पाहून ते दोघेही उंदीर एका कोनाडयात जाऊन लपून बसले. तितक्यातच, दोन मोठे लठ्ठ बोके तेथे आले; त्यांनी मोठा शब्द केला, तो ऐकून खेडवळ उंदराची भयाने छाती धडधडू लागली. मग तो हळूच आपल्या सोबत्यास म्हणतो, ‘मुला, असेच जर तुझे शहरातले सुख असेल, तर ते तुझे तुला लखलाभ असो. मला खेडेच बरे वाटते. तेथील शेतातल्या शेंगा चांगल्या पण रात्रंदिवस जिवास धुगधुग लावणारी ही येथील पक्वान्ने मला नकोत. ’
तात्पर्य: शहरात राहिल्याने पुष्कळ सुखे प्राप्त होतात हे खरे, पण त्या सुखाबरोबर दुःखेही फार भोगावी लागतात. खेडयात मौजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.
Short Story In Marathi -: लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी
एका मुसलमानाचा घरी एका हाऱ्यात काही कोंबडीं ठेवली होती. त्यातली काही कोंबडीं फार लठ्ठ होती व काही अगदी बारीक होती. जी लठ्ठ होती, ती त्या बारीक कोंबडयांची, त्यांच्या अशक्ततेबद्दल वरचेवर थट्टा करून त्यास हिणवीत असत.
शेवटी, एके दिवशी त्या मुसलमानच्या घरी मेजवानी होती, तेव्हा त्याने आपल्या नोकरास आज्ञा केली की, ‘ह्या कोंबडयांत जी लठ्ठ असतील त्यांस मारून त्यांची कढी करा. ’ त्याप्रमाणे, नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडयांस ठार मारू लागले तेव्हा ती आपल्या मनात म्हणतात, ‘आम्ही जर त्या दुसऱ्या कोंबडयांसारखी बारीक असतो, तर हा प्रसंग आमच्यावर आज खचित आला नसता. ’
तात्पर्य: संपत्तीमुळे मनुष्यास गर्व येतो; परंतु जेव्हा लूट होते आणि दरोडे पडतात तेव्हा तीच संपत्ति दुःखास कारण होते.
नक्की वाचा: Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi
Short Story In Marathi -: उंदराची टोपी
एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.
उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’
शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
उपदेश : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
Short Story In Marathi -: चल रे भोपळया टुणुक टुणुक
एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.
ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली .
ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. थोडया दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.
थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात �
Short Story In Marathi -: बुडबुड घागरी
तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली.
मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली तुम्ही जा मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात.
मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते .तेवढी खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली.पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’
मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली.
मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.
तात्पर्य: नेहमी खरे बोलावे
Short Story In Marathi -: कावळा – चिमणीची गोष्ट
एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.
एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’
चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती.
पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले.
कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.
तात्पर्य : लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.
Short Story In Marathi -: कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस
एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.
एक होती कामसू चिमणी. पहिल्या गोष्टीत पाहिली ना घर स्वच्छ ठेवणारी? तीच ती. ती लोळ लोळ लोळली. तर मोत्याने भरली. तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला. तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली. ती देवळात गेली तर तिला साडी-चोळी मिळाली. ती साडी-चोळी नेसली, पालखीत बसली अन् घरी येऊन झोपी गेली.
तात्पर्य: लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.
Short Story In Marathi -: कोल्हा, रानमांजर आणि ससा
एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.
नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.
मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’
तात्पर्य: एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.
Short Story In Marathi -: लग्नातील देणी घेणी
उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, ‘कोन तुम्ही ?’
प्रधान म्हणाला, ‘मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.’
ते एकुण गोसाव्यान विचारलं, ‘राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ ‘राम राम’ म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?’
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, ‘प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?’ तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, ‘महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?’
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, ‘महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.’
राजा प्रधानाला म्हणाला, ‘प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.’ राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, ‘बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?’
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ‘ महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.’
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, ‘महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, ‘तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर ‘स्त्रीधन’ म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?’
राजा आश्चर्यानं म्हणाला, ‘अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?’
गोसावी म्हणाला, ‘नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.’
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.
Short Story In Marathi -: सिंह आणि उंदीर
उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.
पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.
तात्पर्य: जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच
Short Story In Marathi -: सिंह, लांडगा आणि कोल्हा
जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते.
लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’ हे भाषण ऐकून सिंहास कोल्हयाविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशूस पाठविले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, ‘काय रे, मी इतका आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे ?’ कोल्हा उत्तर करतो, ‘महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैदय मी पहात होतो.
शेवटी कालच एका मोठया वैदयाची व माझी गाठ पडली; त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधीने विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता, हा रोग बरा होईल; याशिवाय अन्य उपाय नाही.’ कोल्हयाचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातडयासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला.
तात्पर्य: दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
नक्की वाचा: Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi
Short Story In Marathi -: गाढवाला मिळाली शिक्षा
एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे.
एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि मग ते दोघे पुन्हा चालू लागतात.थोडेसे मीठ पाण्यात विरघाल्यामुळे गाढवाला हलके वाटू लागते आणि ते खूप आनंदी होऊन पुढची वाटचाल करू लागते.
आता दरोज गाढव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसारवू लागले.गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला धडा शिकवायचे ठरवतो.
दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो . गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घासारावते आणि पाण्यात पडते.आजपण त्याचा मालक उठवण्यास मदत करतो पण गाढवाला काही उठता येत नाही कारण,कापसाने पाणी शोषून घेतलेले असते.त्यामुळे ओझे हलके होण्याऐवजी जड झालेले असते. अशा प्रकारे गाढवाला चांगली शिक्षा मिळते.
तात्पर्य: आपल्या कामाशी प्रामाणिकपणे राहावे .
Short Story In Marathi -: प्रमाणिक लाकुडतोड्या
ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो.
त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?’ लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.
सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी, ‘ ही माझी कुऱ्हाड नाही.
मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ‘ हे देखील नाही ‘. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो ‘ होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता!’
देवी म्हणते तुझा प्रामाणिक पणा मला आवडला’ या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला.प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो.
तात्पर्य: नेहमी खरे बोलावे.
Short Story In Marathi -: मुंगी व कबुतर
एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली.
पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.
त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले. अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.
तात्पर्य: संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र
Short Story In Marathi -: ससा आणि सिंह
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्याना ठार मारू नकोस, अशी विनंती केली.
माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा. म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुन्हा सर्वाना ठार मरीन, अशी धमकी त्या सिंहना सर्व प्राण्यांना दिली.
रोज ठरल्याप्रमाणे एक-एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली. तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवस भर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले – काय रे, दिवसभर तू कोठे होतास?
ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला ‘ मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले.’
सिंहाने त्याला रागावूनच विचारले, ‘कोठे आहे दुसरा सिंह?’ ससा म्हणाला चल मी दाखवतो. साशाच्यापाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली, दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला , महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे.
सिंहाने विहिरीत डोकावून पहिले. स्वत:चेच प्रतिबिंब त्याने पहिले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला. अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला. आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला. सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला.
तात्पर्य: शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
Short Story In Marathi -: दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ
एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.
गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला.
म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले.
एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे उशीरा त्याच्या लक्षात आले.
तात्पर्य: दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ
Short Story In Marathi -: दुष्ट कोल्ह्याला शिक्षा
एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,”काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?” उंट म्हणाला,”बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?” तेव्हा कोल्हा म्हणाला,” मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.” उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.
उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.
त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.
तात्पर्य : करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते.
Short Story In Marathi -: बासरीवाला मुलगा आणि गावकरी
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.
त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.
ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.
त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात. आणि पाण्यात बुडून मरतात..
बासरीवाला गावकर्यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्यांची लबाडी कळून येते.
तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.
गावकर्यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.
उपदेश : उपकार करणार्याशी कृतघ्न वागू नये.
Short Story In Marathi -: आति तिथे माती
एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.
देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते मग’भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार?” भिकाऱ्याने झोळी पुढे केली.मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला’मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.
पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली .देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भारत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना.
मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता .शेवटी जे व्हायचे तेच झाले.त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.
त्याच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरात नाही.आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.
तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये.
Short Story In Marathi -: कष्टाचे फळ
एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.
त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलावितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाणयांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.
दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही .मग त्यांनी विचार केला की एवढे शेत कानाला आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले.
त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरगोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यामाना भरपूर धन मिळाले.
गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले,’मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’
तात्पर्य: कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.
Short Story In Marathi -: दोघे वाटसरू आणि अस्वल
दोन गृहस्थ जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी आपसांत असा ठराव केला की, प्रवासात जर एखादयावर काही संकट आले, तर दुसऱ्याने त्यास मदत करावी. पुढे ते एका अरण्यांतून जात असता, एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला.
त्यावेळी त्यापैकी एकजण चपळ होता, तो झटकन एका झाडावर चढून बसला. जड अंगाचा होता, त्याच्याने पळवेना; तेव्हा तो आपला श्र्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन भुईवर पडला. अस्वलाने त्याजजवळ येऊन त्याच्या कानाशी हुंगून पाहिले आणि हे प्रेत आहे असे समजून, त्यास काही उपद्रव न करता, तो निघून गेला.
अस्वल गेल्यावर झाडावरील गृहस्थ खाली उतरून आपल्या सोबत्यात हसत विचारतो, ‘मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले ?’ त्याच्या सोबत्याने उत्तर केले, ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लुच्चाच्या शब्दावर पुनः विश्वास ठेवू नकोस.’
तात्पर्य: सर्व काही ठीक चालले आहे, अशा वेळी पुष्कळ लोक ममता दाखवितात आणि भरंवशाची भाषणे करतात, परंतु संकट प्राप्त झाले म्हणजे जो तो स्वतःचा बचाव करतो. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा विरळा.
Short Story In Marathi -: सुभेदार आणि त्याचा घोडा
एका सुभेदाराचा घोडा फार देखणा आणि चपळ होता; पण त्यापेक्षां दुसरा एक कमी प्रतीचा घोडा त्याने विकत घेतला आणि त्याचे लाड करण्यात आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्यातच आपला बहुतेक वेळ घालवू लागला.
एके दिवशी हा दुसरा घोडा पहिल्या घोडयास म्हणाला, ‘दादा, तू इतका सुंदर, मजबूत आणि चपळ असता, तुजकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात आमच्या धन्यास इतका आनंद वाटतो, याचे कारण काय असावे बरे ?’ पहिला घोडा उत्तर करितो, ‘कोणतीही वस्तू नवी असली, म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व ती अंमळ जुनी झाली की तिजकडे दुर्लक्ष करून नव्या वस्तूच्या नादीं लागावयाचें, हा सर्वसाधारण मनुष्यस्वभाव आहे. हल्ली आपला धनी तुझे फार लाड करतो आहे, पण थोडयाच दिवसांत, मजप्रमाणे तूही त्यास अप्रिय होऊन, तुझ्या जागी नवा घोडा येईल, याबद्दल तुझी खात्री असू दे. ’
तात्पर्य: ‘वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची लोकरीती अशी हे. ’
Short Story In Marathi -: बालहट्ट
एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ?’ बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’
‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’
बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’
‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहाअ बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’
बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा.
बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.
बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?
बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !
बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?
बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑं
बादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.
बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होत ना ? मग आता माराची धमकी का देता ?
बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?’
Short Story In Marathi -: बुड घागरी
बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणतो दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी.
ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’ मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही.
मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.
Short Story In Marathi -: अहंकारी राजाला धडा
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे.
त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला.
राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात.
तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. त?
Short Story In Marathi -: पक्षी आणि पारधी
एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ यावर पारधी म्हणाला, ‘तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.’ पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला.
ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, ‘यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका.’ हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, ‘अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !’
तात्पर्य – लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वार्यालाही उभे रहात नाहीत.
Short Story In Marathi -: घोडा आणि नदी
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, ” निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल”.
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, “पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत.”
उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या….
Short Story In Marathi -: प्रामाणिक पहारेकरी
एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते. ‘ आता काय करायचं ?’ असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला.
पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, ” कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. ” ” तुमी कोण हायसा ? ” पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.
पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, ” आम्ही महाराज आहोत. ” पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय. तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, “आरे, उघड की दरवाजा. “.
” तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. ”
महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.
सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं.
पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.
पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, “तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. ”
Short Story In Marathi -: हिरवा घोडा
एकदा बिरबलाची परिक्षा घेण्यासाठी बादशहा त्याला म्हणाला, ‘बिरबल, मला त्या ठरलेल्या रंगाच्या घोड्यावर बसायचा कंटाळा आलाय. तेव्हा तेव्हा काळा, पांढरा, काळ्यावर पांढरे पट्टे असलेला किंवा पांढऱ्यावर काळे पट्टे असलेला, तपकिरी किंवा तपकिरी रंगात मधूनच पांढरे पट्टे असलेला, राखी, करडा या नेहमीच्या रंगाव्यतीरिक्त असलेल्या रंगाचा घोडा आठवड्याच्या आत आणून दे. एवढी साधी गोष्ट जर तुला जमत नसेल, तर तू माझ्याकडे पुन्हा येऊच नकोस.’
दोन तीन दिवस उगाच आसपासच्या गावात भटकण्यात घालवून चौथ्या दिवशी बिरबल बादशाहाकडे आला व म्हणाला, ‘खाविंद, काम फ़त्ते झालं, हिरव्यागार रंगाचा घॊडा शोधून काढलाय.’
बादशहानं विचारल,’ मग येताना तू तो घोडा घेऊनच का आला नाहीस ?’
बिरबल म्हणाला, ‘मी आणत होतो, ‘पण त्या घोड्याच्या मालकाच्या दोन अटी आहेत. त्याची पहिली अट म्हणजे, तो घोडा घेऊन जायला स्वत: शहेनशहांनी माझ्याकडे यावं.’
बादशहा म्हणाला, ‘हात्तीच्या ! एवढंच ना ? हिरव्या घोड्यासाठी मी स्वत: त्याच्याकडे जायला तयार आहे. बरं, त्याची दुसरी अट कोणती ?’
बिरबल म्हणाला, ‘त्या घोड्याच्या मालकाची दुसरी अट अशी -‘ज्याअर्थी खाविंदाना काळा, पांढरा, तपकीरी, राखी, करडा वगैरेंसारख्या नेहमीच्या रंगाव्यतीरीक्त असलेला माझा हा हिरव्या रंगाचा घॊडा हवा आहे, त्याअर्थी त्यांनीसुध्दा रविवार ते शनिवार या ठरलेल्या सात वारांव्यतिरीक्त इतर वारी माझ्याकडे घोडा न्यायला यावं;
बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाचा चेहराही नेहमीच्या रंगाव्यतिरीक्त अशा वेगळ्याच रंगाचा होऊन गेला !
Short Story In Marathi -: अनमोल भेट
एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?
ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा ह्या गोष्टी तुझ्या प्रजेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा, मुलाबाळांचा हक्क आहे.
साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणांस मी भेट देऊ ? तुम्हीच सांगा.
तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करु शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते.
नक्की वाचा: Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi
Short Story In Marathi -: गणपति
बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी ‘चिंतामणी‘ हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.
कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले.
तो म्हणाला, ”तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?” त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला ‘चिंतामणी’ काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.
कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.
त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा ‘चिंतामणी’ त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.
गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला ‘चिंतामणी’ असे नाव पडले.
Short Story In Marathi -: परीस ( पारस )
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला…. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले… महिने लोटले… वर्षे सरली….
पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ….दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा….
शेवटी तो माणूस म्हातारा झाला…. आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले…
ती साखळी सोन्याची झाली होती…..
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही….
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो…कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने…तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने …..
तर कधी प्रेयसीच्या नात्याने….. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो… आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो……
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो …….
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात …….
Short Story In Marathi -: उंची खिचडी
दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवुन टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, ‘बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा एखादा माणूस शंभर मोहोरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेऊन, रात्र काढील काय रे?’
‘कुणी सांगाव ? परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृत्तीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईलसुध्दा.’ बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, ‘कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता, उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात, गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची, ही अट तुला मान्य आहे ना ?’ त्या गरजू माणसान ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाऱ्यात, त्या तलावातील बर्फ़ागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली.
मग शंभर सुवर्ण मोहोरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता, बादशहानं त्याला विचारलं ‘काय रे ? थंडी एवढी जबरदस्त पडली असताना, तू तलावाच्या गार गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस ?’
तो मनुष्य म्हणाला, ‘आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळवून, मी गेली रात्र कशीतरी घालवली’ त्याच हे विधान ऎकून बादशहाचा हुजऱ्या म्हणाला, ‘ खाविंद, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला, तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हा टक लावून बघत राहिल्याने, त्याची ऊब याला थोड्याफ़ार प्रमाणात का होईना-मिळाली. म्हणजे याने ‘कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या शंभर सुवर्ण मोहोरा द्यायच्या ?’ हुजऱ्याच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला.
मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून, घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला, तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून, बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली; तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फ़िरलयं ! यमुनेकाठी २० हात उंचीचे तीन खांब अगदी एकमेकांजवळ पूरुन त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीय, आणि खाली जमीनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीय !’
हा अजब प्रकार ऎकून आश्चर्यचकीत झालेला बादशहा स्वत: बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, ‘बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतूर असताना, आज तुझ्या डोक्यात हे वेडकसं काय शिरलं ? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का ?’
बिरबल म्हणाला, ‘का नाही लागणार ? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते, तर या शेकोटीची धग अवघ्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये ?’
बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात ‘प्रकाश’ पडला, आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून, त्याला शंभरऎवजी दोनशे सुवर्ण मोहरा दिल्या.
Short Story In Marathi -: लाजाळू पाहुणे
मिथिला नगरीत राहणारा गोनू झा, याच्या घरी एका रात्री चोर आले. मध्यरात्रीच्या सुमारास छपरावरची कौलं काढून घरात शिरलेल्या त्या चोरांची, गोनू ज्या पलंगावर झोपला होता, त्या पलंगाखालच्या पेट्या व संदुका हळूहळू सरकवायला सुरुवात केली.
पलंगाखाली होणाऱ्या खुडबुड आवाजानं गोनूला जाग आली, आणि आपण केवढ्या मोठ्या प्रसंगात सापडलो आहोत, याचीही त्याला कल्पना आली. आता आपण आरडाओरडा केला तर हे चोर आपला व आपल्या बायकोचा प्राणही घ्यायला कमी करणार नाहीत, असा विचार करुन, गोनू बायकोला जागे करीत म्हणाला, ‘अगं सारिके ! उठ ना जरा ! किती सुंदर स्वप्न पडलयं गं मला ! अगं, ते ऎकून तरी घे.’
झोपेत असलेली त्याची बायको डोळे चोळीत म्हणाली, ‘ते स्वप्न उद्या सकाळी सांगून नाही का चालणार ? केवढ्या गाढ झोपेतून उठवलतं तुम्ही मला !’ गोनू म्हणाला, ‘अगं, जुनी माणसं असं सांगतात, की एखादं सोनेरी स्वप्न पडलं की लगोलग ते आपल्या माणसाला सांगावं, म्हणजे ते खरं ठरतं.”असं आहे होय ? मग सांगून टाका एकदाच ते स्वप्न’ बायको जांभई देत म्हणाली.
यावर गोनू म्हणाला, ‘सारिके ! वास्तविक आपल्या लग्नाला एवढी वर्ष होऊन गेली, तरी अजून आपल्या घरात पाळणा हलला नाही. परंतू मला तर असं स्वप्न पडलं, की आपल्याल दोन दोन वर्षाच्या अंतरानं, एका पाठोपाट एक असे एकूण चार मुलगे झाली आहेत. सगळे कसे रुबाबदार, बुध्देवान आणी बलदंड ! आपले ते चार मुलगे रांगता रांगता चालू लागले आहेत, आणि चालता चालता एका पाठोपाठ एक धावूही लागले आहेत. आपले मुलगे असे कुठे कुठे धावू खेळू लागले असता, एकदा काय झालं ठाऊक आहे ?’ डुलकी देत देत बायको म्हणाली, तुम्हाला पडलेल्या स्वप्नात ‘एकदा काय झालं’ ते मला कसं ठाऊक असणार ? काय झालं, ते लवकर एकदाचं सांगून टाका, म्हणजे मी आपली निघोरपणे घोरत पडायल मोकळी होईन.’
गोनू सांगू लागला, ‘एकदा आपले हे चारही चिरंजीव संध्याकाळी खेळायला म्हणून घराबाहेर पडले. दिवे लागले, तरी ते घरी परतले नाहीत, म्हणून तुझ्या सांगण्यावरुन मी त्या चौघांनाही मोठ्यानं हाका मारल्या-‘गदाधर ! धरणीधर ! शशीधर ! विद्याधर ! ताबडतोब या !’
गोनूनं या हाका अशा जबरदस्त जोरानं मारल्या, की त्या ऎकून गदधर, धरणीधर,शशीधर, विद्याधर या नावांचे त्याच्या शेजारी राहणारे तगडे तरुण जागे झाले, आणि हाती सोटे घेऊन व गोनूच्या घराच्या पुढल्या दरवाजापाशी य़ेऊन ते म्हणाले, ‘गोनूकाका, कशाला हाका मारल्यात ?’
त्यांचा आवाज ऎकताच दिव्याची वात मोठी करुन गोनूनं पुढला दरवाजा उघडला, त्या चार तरुणांपाठोपाठ इतर शेजाऱ्यांनीही त्या घराभोवती गर्दी केली होती. ते सोटेधारी तरुन घरात शिरताच, गोनू म्हणाला, ‘आमच्याकडे पाहुणे आले आहेत, पण ते अतिशय लाजाळू आहेत. आमच्याकडे पलंग दोन आहेत आणि माणसेही दोन तेव्हा आमची गैरसोय होऊ नये म्हणून बिचारे चकार शब्द न बोलता, आमच्या पलंगाच्या खाली झोपले आहेत. म्हणून यांना तुम्ही तुमच्याकडे नेऊन चांगले पलंगावर झोपवता का ?’
गोनूच्या बोलण्यातला अर्थ उमजून ते तरुण हसत म्हणाले, ‘गोनूकाका ती काळजी तुम्ही करु नका. आम्ही त्यांना चांगलेच झोपवतो.’ असं म्हणून त्या तरुणांनी पलंगाखाली दडलेल्या त्या चोरांना बाहेर यायला सांगून त्यांच्या मुसक्या बांधल्या, आणि त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी कोतवालाच्या हवाली केले.
Short Story In Marathi -: मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !
एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली.
देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !
मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदीरहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती’ ठेवा.
Short Story In Marathi -: न संपणारी गोष्ट
एका राजकन्येला गोष्टी ऎकण्याचा भलताच छंद लागला. कुणालातरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत रहावे लागे. परंतू गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे !
अखेर एकदा राजाने जाहीर केले, ‘जो मनुष्य आतापासून, ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक एक हजार सुवर्ण मोहोरांचे वेतन दिले जाईल.’
राजाने राज्यात पिटवलेली ही दवंडी ऎकून राज्यातलेच नव्हे, तर इतर राज्यातलेही अनेकजण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही.
एके दिवशी एकजण राजवाडयावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले. राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.-
‘एक होते भातगाव नावाचे गाव. त्या गावात आठ मैल लांबीचे, चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे, भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला ‘भातगाव’ हे नाव पडले होते.’
शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या. म्हणून त्या गावाचे नाव ‘चिमणपूर’ असे पडले होते.’
राजकन्या उत्साहानं म्हणाली, ‘अय्या ! मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट. पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना ?’
गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘न संपणारी आहे, म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना? पण कलावती राजे ! आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऎका.’
याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, ‘एकदा काय झालं? कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ! ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फ़टीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली !
‘सुहास्यवदनाने चोचीतून दाणा घेऊन घरट्याकडे जाणा-या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, ‘चिमूताई ! चिमण्यांच्या अफ़ाट संख्यावाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नान्न करुन मरत असताना, तू आंबेमोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठुन ग आणलास?’ त्या चिमणीनं खर ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरुन त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली!’
‘अय्या ! किती बहारदार त-हेनं सांगता हो ? सांगा सांगा. पुढं काय झालं ते सांगा.’ राजकन्या उत्कंठेनं म्हणाली.
‘पुढं काय सांगायचं ? जे व्हायचं होतं ते झालं ! तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. पाचवी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. अकरावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली .. बत्तीसावी… सत्तरावी….एकशे एकावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली !’
सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, ‘किती च-हाट लावता हो ? कधी संपणार हे तुमचं च-हाट?’
गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत, ते संपूण गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही.’
राजकन्या म्हणाली, ‘मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही दहा वर्षे घ्याल.’
गोष्ट सांगणारा म्हणाला, ‘कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही.’
यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, ‘ मला आजची गोष्ट ऎकत असता, एकंदरीत ‘गोष्ट’ या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की, यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये, आणि मी ती ऎकू नये, असं वाटू लागलंय !’
गोष्ट सांगणा-याने सुरु केलेल्या गोष्टीचे स्वरुप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, ‘ गोष्ट सांगणा-याने बनवले असले, तरी त्या च-हाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन, आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला.’ राजाने या गोष्टीचा आनंद मानला, आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगताही, मासिक एक हजार मोहोरांचे वेतन सुरु केले.
Short Story In Marathi -: सुंदर अर्थपूर्ण प्रेमळ कथा
“सांगली जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,
“राजू,
तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती”
दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले,
” बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत”
दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.
लगेच मुलाचे पत्र आले, ” बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा” ………… इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.
तात्पर्य : मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.
Short Story In Marathi -: भगवान गौतम बुद्ध
लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले . त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुलं मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, ‘भगवन ! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय ? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.’
चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, ‘माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन.’ बुध्ददेवांचे हे आश्वासन ऎकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रतेक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !
एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, ‘दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुसर्या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली !’ कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.
या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, ‘भगवन ! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही.’ बुध्ददेव म्हणाले, ‘माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऎवजी आज मृत्यू आला, म्हणून असं दु:ख करीत बसणं योग्य आहे का ? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दु:ख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.’ भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दु:खी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.
Short Story In Marathi -: भुताला कामगिरी
एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरु केला, पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे, त्याच्यावर देवाऎवजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले.
ते भूत त्याला म्हणाला, ‘तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन, पण जर का तू मजकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास, तर मात्र मी तुला खाऊन टाकीन.’त्या माणसानं आंबे मागितले, भुतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले !त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली, भुतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली !त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला, भुतानं पंचपक्वान्नांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करुन ठेवला !दहा हजार रुपयांची मागणीही त्या भुतानं अशीच बघता बघता पूर्ण केली !
‘मागून मागून आता एकसारखं मागायच तरी काय ? या विचारात तो मनुष्य पडला असता, ते भूत त्याला म्हणालं, ‘मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना तुझ्या जवळ ? मग मी आता तुला खाऊन टाकतो.’भुताची एक धमकी ऎकून त्या माणसाला एक युक्ती सुचली. तो त्या भुताला म्हणाला, ‘एक मल्लखांब तयार करुन तो मागल्या अंगणात पूर पाहू ?’मल्लखांब तयार करुन, तो पुरलादेखील,’ भूत म्हणालं.तो गृहस्थ त्या भुताला म्हणाला, ‘बस्स ! आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम. फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं, आणि माझं काम झालं रे झालं, की या मल्लखांबाकडे जाऊन, त्याच्यावर चढत उतरत राहायचं.’
अशा तर्हेने त्या मनुष्यानं त्या भुताकडून आयुष्यभर आपली कामे तर करुन घेतलीच, पण उरलेल्या वेळेत त्या भुतामागे त्या मल्लखांबावर चढण्या-उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम नसलेल्या वेळी येणार्या मृत्युची भीतीही टाळली.
Short Story In Marathi -: अंधारात कसा चढणार डोंगर
तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने….
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला..
इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.
‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.
शेतकरी म्हणाला, ”राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.”
म्हातारा हसला…. म्हणाला, ”अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?”
”एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.” तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ”अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.”
म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं?
जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
Short Story In Marathi -: तेनालीराम जे वाक्चातुर्य
एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी.
मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.
सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’
‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’’
सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’!
महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्याचशा दरबार्यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’
Short Story In Marathi -: देव नांदतो आपल्या अंतरी!
श्याम नावाचा एक मुलगा होता. तुमच्यासारखाच शाळेत जायचा, रोज अभ्यास करायचा, चांगले मार्क मिळवायचा, आईला कामात मदत करायचा. असा तुमच्यासारखाच गुणी मुलगा होता तो. आई तर त्याचं नेहमी कौतुक करायची. ‘शहाणा माझा शामु!’ असही म्हणायची. मग श्यामु गालात खुदकन हसायचा आणि आईला बिलगायचा. श्यामचा दिनक्रम ठरलेला असे. तो सकाळी उठुन सुर्यनमस्कार घालायचा. मग घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचा, देवाला नमस्कार करायचा. आणि मग पटापट आवरुन शाळेत जायचा. तिथुन घरी आला की मग अभ्यास, थोडावेळ खेळणं, आईला घरकामात, आजीला वाती वळण्यासाठी मदत करायचा. मग संध्याकाळी जायचा बाहेर खेळायला. त्याचा हा गुणी स्वभाव बघून आई त्याला कधी कधी ओरडत नसे, बाबा रागवत नसत आणि आजी तर काय, त्याचे खूप लाड करत असे. पण म्हणून श्याम काही लाडावलेला नव्हता काही! कुठल्या गोष्टींसाठी हट्ट करायचा, कुठल्या गोष्टींसाठी नाही, हे त्याला व्यवस्थित कळत असे. तुम्ही पण उगाच करत नाही ना हट्ट? तसच श्यामचं पण होतं. श्याम वर्गात पण सगळ्यात हुशार होता. हो, पण आगाऊ मात्र अजिबात नव्हता हं. पण त्याला भारी प्रश्न पडत असत. हे असच का घडतं? पाऊस का पडतो? अन्न कसं तयार होतं? असे वेगवेगळे प्रश्न त्याला पडत असत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं नाही ना मिळाली की श्याम ती उत्तरं शोधुन काढतच असे.
एकदा काय झालं, वर्गात सर गोष्ट सांगत होते. गोष्ट होती ‘देव आणि दानवांची’. दानव कसे साध्या माणसांना त्रास देतात, मग देव कसे त्या माणसांना येऊन सोडवतात, दानवांचं संकटं दूर करतात अशी साधारण गोष्ट होती ती. गोष्ट संपली आणि श्यामने सरांना प्रश्न विचारला, ‘सर, तुम्ही दानव पाहिलेत?’ सर म्हणाले, ‘नाही. मी कशाला पाहीन दानव?’ ‘मग तुम्ही देव पाहिलाय?’ श्यामने लगेच विचारलं. सर म्हणाले, ‘हो. पाहिला आहे तर. देवळात पाहिलाय.’ श्यामने लगेच दुसरा प्रश्न विचारला, ‘मग सर कसा होता देव? माणसांसारखा होता देव? आणि तो बोलला तुमच्याशी?’ आता मात्र सरांना हसायला आलं. ते म्हणाले, ‘अरे श्याम, देव असा बोलत नाही रे आपल्याशी. आणि तो माणसासारखा नसतोच मुळी. तो वेगळा असतो. आणि बरं का, आपण त्याच्याशी बोलायचं असतं. त्याची पूजा करायची असते. मग तो प्रसन्न झाला तरच बोलतो आपल्याशी!’ पण सरांनी असं सांगितल्यावरही श्यामचं निरसन मात्र काही होईना. ‘पण जरका तो बोललाच नाही, तर आपल्याला कसं वाचवणार? आपली संकटं कशी दूर करणार?’ श्यामचा असा प्रश्न ऐकल्यावर सर मात्र जरा गोंधळले. पण त्यांनी श्यामला समजावलं. ते म्हणाले, ‘श्याम , अरे देव नक्की येतो संकटांना धाऊन. आणि कसा येतो हे जर तुला जाणून घ्यायचं असेल, तर तु त्यालाच का नाही विचारत?’ सरांचं हे म्हणणं श्यामला अगदी पुरेपूर पटलं. ‘जर आपणच देवाशी बोललो तर? आणि तो आपल्याशी बोलणारच नाही, असं होणारच नाही!’ श्यामने असा विचार करत असतानाच शाळेची सुटण्याची घंटा वाजली.
श्याम शाळा सुटून घरी येईपर्यंत देवाच्याच विचारात होता. घरात आल्या आल्या तो देवघरापाशी गेला. पण बघतो तर काय, देवाच्या मुर्त्या तर ढिम्म बसून होत्या. आता ह्यांना बोलतं कसं करायचं? तेवढ्यात श्यामला आईची हाक ऐकु आली. ती त्याला जेवायला बोलवत होती. श्यामने पटापट तोंड आणि हात-पाय धुतले, कपडे बदलले. आणि आला जेवायला. जेवायला आईने श्यामची आवडती भरल्या-वाग्यांची भाजी केली होती. ती भाजी बघुन त्याला खूप आनंद झाला. एवढ्यात त्याला कल्पना सुचली. त्याने आजीला विचारलं, ‘आजी, मला जशी वाग्यांची भाजी आवडते, तसं देवाला पण असच काही आवडत असेल ना!’ आजी म्हणाली, ‘हो तर. प्रत्येक देवाला काही ना काही पक्वान्न आवडतं.’ ‘मग सांग ना, कुठल्या कुठल्या देवाला काय काय आवडतं ते!’ श्यामने असा प्रश्न विचारल्यावर आजीला हसुच आलं. मग तीने कुठल्या देवाला काय आवडतं, ते सगळं सांगितलं. गणपतीला मोदक आवडतात, कृष्णाला दही-तुप आवडतं असं प्रत्येक देवाचं सांगितलं. हे सगळं सांगुन झाल्यावर आजीने विचारलं, ‘काय रे पण श्याम, तु हे सगळं का विचारतोयेस?’ पण श्याम मात्र त्यावर काहीच बोलला नाही. ‘आहे माझी एक गंमत….’ असं म्हणाला आणि हात धुवायला उठला. आई आणि आजी मात्र बघतच राहिल्या. ‘ह्या श्यामच्या डोक्यात नक्की काय चाललय?’ आजी आईकडे बघत म्हणाली. पण श्यामचं नक्की काय चाललं होतं. ह्याचा थांगपत्ता मात्र दोघींनाही नव्ह्ता.
संध्याकाळ झाली होती, आजी देवाजवळ दिवा लावत होती. श्याम तिथे होताच. त्याने देवाजवळ हात जोडले आणि त्याला मनातल्या म्हणाला, ‘देवा मी आज तुझ्या आवडीचं पक्वान्न आणणार आहे. मग तरी तु माझ्याशी बोलशील ना?’ श्यामने डोळे किलकिले करुन पाहिले. पण देव मात्र काही बोलत नव्हता. तो आपला ढिम्म! पण श्यामने हार काही मानली नाही. रात्री सगळे झोपल्यावर श्याम हळूच देवघरापाशी आला. देवघरातला दिवा शांतपणे तेवत होता. श्यामने देवाला फुलं वाहिली. त्याच्यासमोर उदबत्ती लावली. अथर्वशिर्ष म्हटलं, प्रत्येकाच्या आवडीची वेगवेगळी पक्वान्न ठेवली. आणि राहिला बसून, देव कधी बोलेल हे बघत. पण कसलं काय, देव काही बोलायला तयार होईना. एक तास झाला, दोन तास झाले, रात्रीचा एक वाजत आला होता. पण देव काही बोलायला तयार नव्हता. श्यामला पेंग येत होती. आणि तो कधी झोपला ते त्याचं त्याला कळलही नाही.
दुस-या दिवशी आई बघते तर काय, श्याम देवघरात झोपलेला. आईने आजीला बोलवलं, बाबांना बोलवलं. सगळ्यांनी श्यामला उठवलं. श्याम डोळे चोळत उठला, आणि त्याने विचारलं, ‘देव बोलला का?’ आईला काही कळेचना, बाबांनाही काही समजत नव्हतं. आजीने श्यामला विचारलं, ‘अरे श्याम देव कशाला बोलायला हवा?’ मग श्यामने काय घडलं ते सगळं सांगितलं. ‘अगं आजी, जर देव बोललाच नाही तर तो संकटं कशी दूर करणार?’ श्यामचं हे म्हणणं ऐकल्यावर सगळ्यांना हसुच आलं. आई हसु दाबत म्हणाली, ‘काय अरे श्याम, असं कधी होतं का? देव कधी बोलतो का?’ ‘पण मला देवाशी बोलायचं आहे.’ श्याम रडकुंडीला येऊन म्हणाला. मग आजी म्हणाली, ‘श्याम चल, देवाजवळ हात जोड. डोळे मीट. आणि मी सांगते ते शांतपणे ऐक. म्हणजे देव तुझ्याशी नक्की बोलेल.’ देव बोलणार म्हटल्यावर श्यामने लगेच डोळे मिटले, हात जोडले. आजी म्हणाली, ‘अरे देवाशी बोलणं फार सोप्पं नाही हं श्याम. खूप कठीण काम आहे ते. आणि तुला माहितीय का कठीण आहे ते?’ श्यामने नकारार्थी मान हलवली. ‘श्याम कारण देव ह्या देवघरात, मुर्तीत रहात नाही. तो सगळीकडे आहे. प्रत्येक माणसाच्या ह्रदयात आहे. त्यामुळे जरका तुला त्याच्याशी बोलायचं असेल, तर तुला माणसांशी चांगलं वागावं लागेल, त्यांना मदत करावी लागेल. पशु-प्राण्यांवर भुतदया दाखवावी लागेल. हे जर तु केलस तरच देव बोलेल तुझ्याशी.’ आजीने असं सांगितल्यावर श्यामला देवाचा खरा अर्थ कळला. देव मुर्तीत नाही, माणसात शोधायला हवा. आणि माणसाशी आपुलकीने बोललो म्हणजेच देवाशी बोललो, हे त्याला नीट कळून चुकलं. आणि तेव्हापासून श्यामने देवाच्या मुर्तीशी बोलायचा अट्टाहास सोडून दिला.
नक्की वाचा: Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi
Short Story In Marathi -: अग्नीदेवाचा प्रसाद
राजाने एक ब्राह्मण अरण्यात बेलफळाचा यज्ञ करत असलेला पाहणे : विक्रमशिला नगरीत विक्रमतुंग नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याला एक ब्राह्मण एका झाडाखाली बेलफळाचा यज्ञ करतांना दिसला. तो एक बेलफळ हातात घेई आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कुंडात टाकत असे. राजा कुतूहलाने ते बघत थोडावेळ उभा राहिला आणि नंतर निघून गेला.
राजाने काही दिवसांनी तोच ब्राह्मण यज्ञ करत असलेला पाहणे, राजाने चौकशी केल्यावर अग्निदेवाने प्रसन्न होऊन सोन्याचे बेलफळ द्यावे आणि इच्छित वर द्यावा, या कामनेने मी यज्ञ करत असल्याचे सांगणे; पण अजूनही अग्नीदेव प्रसन्न होत नसल्याचेही सांगणे : काही दिवसांनी राजा पुन्हा त्या बाजूला आला. अजूनही तो ब्राह्मण तिथेच होता. त्याचा बेलफळाचा होम अजूनही चालूच होता. राजाने त्याला विचारले, ‘‘हे ब्राह्मण आपण कोण ? आपण काय करत आहात ?’’
त्यावर ब्राह्मण म्हणाला, ‘‘माझं नाव नागशर्मा. मी बेलफळाचा होम करतो आहे. या होमाने अग्नीदेव प्रसन्न व्हावा, त्याने सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रकट व्हावे आणि इच्छित वर मला द्यावा; म्हणून मी हा होम करतोय. गेले कित्यक दिवस मी होम करतोय; पण अद्याप तरी मला अग्नीदेव प्रसन्न झाला नाही.’’
अग्नीदेवा, ‘आता जर तू प्रसन्न झाला नाहीस, तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन’, असे म्हणून राजाने बेलफळ अर्पण करताच अग्नीदेव प्रसन्न होणे, राजाची आणि ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करणे : राजा म्हणाला, ‘‘मी प्रयत्न करून बघू का ? मला मंत्र सांगा.’’ नागशर्माने राजाच्या हातात बेलफळ दिले आणि मंत्र सांगितला. राजाने मंत्र म्हणून बेलफळाचे हवन केले; पण काहीही लाभ झाला नाही.
नंतर राजाने आणखी एक बेलफळ घेतले आणि म्हणाला, ‘‘अग्नीदेवा, आता जर तू प्रसन्न झाला नाहीस, तर मी माझे मस्तकच तुला अर्पण करीन.’’ राजाने मंत्र म्हणून बेलफळ यज्ञकुंडात टाकले आणि काय आश्चर्य ? प्रत्यक्ष अग्नीदेव हातात सोन्याचे बेलफळ घेऊन यज्ञकुंडातून प्रकट झाले आणि म्हणाले, ‘तुझ्या धैर्याने मी संतुष्ट झालो आहे. सांग तुला काय हवं ?’
राजा म्हणाला, ‘या ब्राह्मणाची इच्छा पूर्ण कर.’ अग्नीने ब्राह्मणाला म्हटले, ‘ब्राह्मणा, तू धनवंत होशील. तुझी संपत्ती अक्षय राहील.’ ब्राह्मणाने अग्नीदेवाला विचारले, ‘मी इतके दिवस यज्ञ करतो आहे; पण मला तू का प्रसन्न झाला नाहीस ? राजाने एकच बेलफळाचे हवन करताच तू कसा प्रकट झालास ?’
राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नसल्याने अग्नीदेवाने त्यांना भरभरून देणे : राजाने स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते. अग्नीदेव म्हणाला, ‘तू यशवंत, कीर्तीवंत राजा होशील. तुझ्या राज्यात धन-धान्याची उणीव कधीच भासणार नाही. त्याप्रमाणे मी तुला आणखी एक वर देतो. जे अदृश्य रूपात घडत असेल, तेही तुला दिसेल.’
राजाने आणि नागशर्मा ब्राह्मणाने अग्नीदेवतेला वंदन केले आणि अग्नीदेव अंतर्धान पावले. राजा आपल्या नगराकडे आणि नागशर्मा त्याच्या घराकडे परतले.
राजाच्या दरबारात तांब्याचे मंत्राने चूर्ण टाकून सोने करणारा एक ब्राह्मण येणे, दरबारात हा प्रयोग असफल होणे; कारण ते चूर्ण सूक्ष्मरूपाने दरबारात असलेल्या यक्षाने झेलणे, हे राजाच्या लक्षात येणे, राजाने त्याचे हात धरणे आणि तांब्याचे सोने होणे : एक दिवस दरबार भरला असतांना दरबारात दत्तशर्मा नावाचा एक ब्राह्मण आला. तो म्हणाला, ‘‘मी असे एक चूर्ण शोधून काढले आहे, जे तांब्यावर टाकले असता त्याचे सोने होते. मी आपल्याला हे सिद्ध करून दाखवेन.’’ त्याप्रमाणे दरबारात तांब्याचे भांडे आणवले गेले. दत्तशर्माने काही मंत्र म्हणून त्याच्यावर चूर्ण टाकले; पण तांब्याचे भांडे काही सोन्याचे झाले नाही. दत्तशर्माने तीन वेळा प्रयत्न करून बघितला; पण तरीही तांब्याचे भांडे सोन्याचे झाले नाही.
दरबारी मंडळी म्हणाली, ‘‘महाराज, हा माणूस लबाड आहे. आपल्याला तो फसवून आपल्याकडून पैसे लुबाडायला आलाय. त्याला चांगली शिक्षा करा.’’
दत्तशर्मा म्हणाला, ‘‘महाराज, मी मुळीच खोटे बोलत नाही. माझ्या घरी अनेक वेळा प्रयोग करून पाहिल्यावरच मी आपल्याला दाखवण्यासाठी इथे आलोय. आज माझा प्रयोग फसला हे खरे; पण का ते मला कळत नाही.’’
दत्तशर्माचा प्रयोग का फसला होता, हे त्याला नाही, तरी राजाला बरोबर कळले होते. एक यक्ष तिथे अदृश्य रूपात उपस्थित होता. दत्तशर्माने मंत्र म्हणून चूर्ण टाकले की, तो ते वरच्यावर झेली. चूर्ण तांब्यापर्यत पोहोचतच नव्हते, तर ते सोन्याचे होणार कसे ? मग राजाने दत्तशर्माला सांगितले, ‘‘तू केवळ आणखी एकदाच तुझा प्रयोग कर.’’ त्याप्रमाणे दत्तशर्माने मंत्र म्हणताच चूर्ण झेलण्यासाठी यक्षाने पुढे केलेले हात राजाने धरले. अर्थातच चूर्ण तांब्याच्या भांड्यावर पडले आणि भांडे सोन्याचे झाले.
यक्षाने राजाची क्षमा मागणे, राजाने ब्राह्मणाचे कौतुक करून त्याला आपल्या दरबारी मानकरी म्हणून ठेऊन घेणे : इकडे राजाने हात धरल्यामुळे यक्षाला तेथून जाता येईना. त्याला दृष्यरूप धारण करावे लागले. तो दृष्य झाला. राजाने सांगितले, ‘‘हा वरच्यावर तू टाकलेले चूर्ण झेलत होता; म्हणून प्रथम तीन वेळा भांडे सोन्याचे झाले नाही.’’ यक्षाने राजाची आणि दत्तशर्माची क्षमा मागितली आणि तो पुन्हा अदृष्य होऊन निघून गेला. दरबारी मंडळींनी राजाचा आणि दत्तशर्माचा जयजयकार केला. राजाने दत्तशर्माचे कौतुक तर केलेच, त्याजबरोबर आपल्या दरबारात मानकरी म्हणून ठेऊनही घेतले. पुढे अनेक वर्षे राजाने राज्य केले. आपल्या प्रजेला सुखात, आनंदात ठेवले.
Short Story In Marathi -: किती चतूर बायका
एक गृहस्थ सकाळी सकाळीच आपल्या बायकोवर अत्यंत शुल्लक अशा कारणास्तव रागावला. अगदी तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. दुपारचं जेवणसुध्दा त्यानं मिटल्या तोंडानं घेतलंदिवस अशा तर्हेने सरला. संध्याकाळ झाली नव्हे रात्रही झाली आणि चूपचाप जेवून तो झोपायच्या खोलीत गेला व दिवा न लावता अंथरुणावर आडवा झाला.
राग असो वा लोभ असो, तो मर्यादेनंच शोभून दिसतो. सुंदर दिसणारं बाळसेदार शरीरसुद्धा अति बाळसेदार झालं की बेढब दिसू लागत. ‘ह्यांच’’ वागणसुध्दा असंच मर्यादा सोडून नाही का ? भांडणाचं कारण ते क्षुल्लक, आणि त्याकरिता यांनी दिवसभर रागावून रहावं ? ते काही नाही; यांच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे, असा विचार करुन त्या गृहस्थाच्या चतूर बायकोनं एक मेणबत्ती पेटविली आणि ज्या खोलीत तो झोपला होता, त्या खोलीचा कानाकोपरा ती त्या मेणबत्तीच्या प्रकाशात धुंडाळू लागली.
बराच वेळ झाला तरी आपल्या बायकोचं धुंडाळणं संपत नाहिसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या गृहस्थानं तिला विचारलं, ‘काय गं? काय शोधते आहेस?’यावर ती म्हणाली, ‘सकाळपासून तुमची वाचा कुठे गडप झाली, ती शोधत होते पण अखेर सापडली ”तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं त्या गॄहस्थाला एकदम हसू फुटलं व बायकोवरचा त्याचा राग कुठल्याकुठे निघून गेला !
Short Story In Marathi -: अशी झाली फटफजिती!
वनराई जंगलात ‘बंटी’ नावाचा ससा रहात असे. पांढरशुभ्र अंग, इटुकले डोळे आणि गोड-मधाळ बोलणं ह्यासाठी बंटी संपूर्ण वनात प्रसिद्ध होता. त्याचं मोठं शेत होतं. त्याच्या शेतात बरीच धान्यं पिकायची. तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी; झालच तर गाजर, मुळा, भुईमुगाच्या शेंगा, रताळं असं सगळं काही भरभरुन यायचं. बंटी आणि त्याची बायको बनी, दोघही शेत फुलवण्यासाठी खुप मेहनत घ्यायचे. त्यांना खतपाणी द्यायचे, जमिनीची मशागत करायचे. त्यामुळे बंटीच्या शेतात चांगलं पिक यायचं. गाजरं तर इतकी लाल आणि रसरशीत असायची आणि चवीला तर एकदम गोड. आणि मुळा तर एकदम पांढरा शुभ्र! वनातले सगळे प्राणी बंटी सशाकडूनच धान्य, कंदमूळं घ्यायचे.
रोज पहाटे ५ वाजता बंटी आणि बनी उठायचे, बरोबर भाकरी, भाजी आणि थोडीशी चटणी घ्यायचे आणि निघायचे शेतावर. एके दिवशी काय झालं, पहाटे पहाटे बंटी आणि बनी आले शेतावर. कारण त्यांना पिकांची कापणी करायची होती. गाजरं, मुळा उपटून ते स्वच्छ धुवुन विकण्यासाठी तयार करायचे होते. पण दोघजणं येऊन बघतात तर काय, गव्हाचं पिक कोणीतरी कुरतडलेलं होतं, तांदळाची पाती कोणीतरी खाऊन टाकली होती. आणि गाजरं, मुळे अर्धवट खाल्लेले होते. ‘बापरे! कोणी केलं असेल हे?’ बंटी बनीला म्ह्णाला. ‘अहो आता काय करायचं? वनातल्या प्राण्यांना काय द्यायचं?’ बनी काळजीने म्हणाली. बंटी म्हणाला, ‘घाबरु नकोस बनी. आपण जी पिकं, कंदमुळ चांगली आहेत, ती काढुन ठेवु. आणि काम झालं की ह्यावर विचार करु.’ बंटी असं म्हणाल्यावर बनी जोरात कामाला लागली.
बंटीने गव्हाची, तांदुळाची सगळी चांगली पिकं काढली. त्यातुन दाणे बाजुला काढले आणि पोती भरुन ठेवुन दिली. बनीने सगळी गाजरं उपटली, मुळे उपटले. चांगले होते ते ठेवून दिले आणि जे अर्धवट खाल्लेले होते ते टाकून दिले. नाही म्हटलं तरी पन्नास पोती तरी गहू, तांदुळ, गाजरं आणि मुळ्याने भरली. ‘पण शेतात घुसुन कोणी धान्य आणि कंदमुळं खाल्ली असतील?’ हा विचार काही बंटी आणि बनीच्या मनातुन जाईना. ‘हे काम कोणीतरी रात्रीच केलेलं आहे.’ बंटी विचार करता करता म्हणाला. ‘पण शोधुन कसं काढायचं?’ दोघही डोकं खाजवत विचार करायला लागले. शेवटी बंटी आणि बनीने रात्री पहारा देऊन ते शोधुन काढायचं ठरवलं. एकेक करुन दोघही पहारा देऊ लागले. १० वाजून गेले, ११ वाजुन अर्धा तास झाला तरी शेतावर काही कोणी आल्याचं बंटीला आणि बनीला दिसलं नाही.
मध्यरात्र झाली होती. रातकिड्यांचा किर्रर्र आवाज येत होता. तेवढ्यात बंटीला शेतात पावलांचे आवाज ऐकु आले. बंटी आणि बनी दोघही कानोसा घेऊन ऐकु लागले. चिंची घुस आणि मोन्या उंदीर शेतात शिरलेले त्यांनी पाहिले. चिंची आणि मोन्या संपूर्ण शेतभर इकडे तिकडे फिरत काही खायला मिळतय का ते बघत होते. पण बंटी आणि बनीने सकाळीच सगळं पिक काढून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांना काहीच खायला मिळत नव्हतं. चिंची आणि मोन्या हात हलवत आल्या पावली परत गेले. ‘चिंची आणि मोन्या आहेत तर ह्या सगळ्या मागे!॰’ बंटी म्हणाला. ‘पण आता ह्यांचं काय करायचं?’ बनी बंटीला विचारत होती. ‘ते बघू. उद्या सकाळी त्यावर विचार करु.’ बंटी असं म्हणाला. आणि दोघही घरी झोपायला गेले.
दुस-या दिवशी येऊन पहातात तर काय, शेतातली सगळी माती छान भुसभुशीत झालेली. त्याचं काय झालं, चिंची आणि मोन्याने खायला मिळावं म्हणून संपूर्ण शेत पिंजुन काढलं. एकदा चिंची जमिनीखाली जाउन बघायची, एकदा मोन्या. त्यामुळे शेतातली सगळी जमीन छान भुसभुशीत झाली होती. ‘अरे वा, चला आपलं कामच झालं.’ बनी टाळ्या वाजवत म्हणाली. पण बंटी मात्र काही खुष दिसत नव्हता.’ बनी अगं आपलं काम जरी झालं असलं, तरी ह्या दोन चोरांना आपलं शेत खाण्यासाठी चांगलच आंदण म्हणून मिळालय. आपण त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.’ बंटी विचार करत म्हणाला. ‘बंदोबस्त कशासाठी?’ बनीने अगदी आश्चर्याने विचारलं. ‘अगं, ते नेहमीच आपल्या शेतात येत रहातील. आणि आपलं पिक कुरतडत रहातील. आज हे दोघजणं आहेत. उद्या अजून येतील.’ बनीला बंटीचं म्हणणं पूर्णपणे पटलं. पण ह्यावर उपाय काय? दोघं विचार करत होते. एवढ्यात बंटीला एक कल्पना सुचली. त्याने घरातलं थोडसं धान्य, काही गाजरं आणि काही मुळ्याची पानं घेतली.
आणि गेला चिंची आणि मोन्याकडे. चिंची आणि मोन्या तर बंटीला बघून चांगलेच घाबरले. बंटी म्हणाला, ‘घाबरु नका, मला माहितीय तुम्ही माझ्या शेतातलं धान्य चोरुन खाता ते. पण मी काही तुम्हाला पकडून द्यायला आलेलो नाही. तुम्हाला काल माझ्या शेतात काहीच खायला मिळालं नाही. पण त्यामुळे माझ्या शेताची माती मात्र चांगलीच भुसभुशीत झाली. आणि म्हणूनच तुमचे आभार मानण्यासाठी मी हे थोडसं धान्य आणि गाजरं घेऊन आलेलो आहे.’ चिंची आणि मोन्या तर बघतच राहिले. ‘बंटीने चक्क आपले आभार मानले?’ त्या दोघांनाही विश्वासच बसत नव्हता. बंटी त्यांना म्हणाला, ‘आणि म्हणूनच मी तुम्हाला एक आमंत्रणही देण्यासाठी आलेलो आहे. पुढच्या महिन्यात, माझं शेत परत धान्यांनी, कंदमुळांनी बहरुन येईल. तुम्ही हवं तेवढं आणि हवं ते खाऊ शकता.’ चिंची आणि मोन्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. बंटीने तर आमंत्रण दिलय म्हटल्यावर काय विचारायलाच नको.
बंटीने लगेच चिंची आणि मोन्यासाठी तयारी सुरु केली. जमिनीला अजुन खतपाणी दिलं, वेगवेगळ्या भाज्या, कंदमुळं लावली. पण तो कुठल्या भाज्या लावतोय, ते मात्र अजिबात सांगितलं नाही हं त्याने. बंटी आणि बनी जोरात कामाला लागले होते. एक महिना पूर्ण होत होता आणि इकडे बंटीचं शेत फुलत होतं. चिंची आणि मोन्याला आठवण करुन देण्यासाठी बंटी स्वतः गेला. आणि त्यांना बरोबर मध्यरात्र सुरु झाल्यावर शेतात यायला सांगितलं.
११ वाजून गेले होते, मध्यरात्र होत आली होती. बंटी आणि बनी एका झुडपाच्या मागे लपून बसले होते. तेवढ्यात शेतात पावलं वाजली. चिंची आणि मोन्या शेतात आले होते. त्यांना तर कधी एकदा खातोय असं झालं होतं. ‘आज अगदी फडशा पाडून टाकु.’ मोन्या कुजबुजला. ते शेताच्या एका भागात आले. तिकडे ब-याच वेली होत्या. ‘अरे वा, बंटीने काकड्या लावलेल्या दिसतायत.’ चिंची म्हणाली. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि असं म्हणून तिने आणि मोन्याने एका वेलाची काकडी काढली आणि त्याचा घास तोडला. ‘शी! ही कुठली कडू कडू काकडी?’ मोन्या तोंडातला घास थुकत म्हणाला. पण ती काकडी नव्हतीच मुळी. ते कडू कडू कारलं होतं. चिंची आणि मोन्याने त्या काकड्यांचा नाद सोडला आणि आता दुस-या भागात गेले. ‘अरे वा, गाजराचा पाला!’ असं म्हणून त्यांनी लगेच तो उपटला आणि तोंडात टाकला. पण ‘शी! हे काय कडू कडू आहे? मेथी?’ दोघही तोंडातला पाला थुकत होते. इतक्यात चिंचीला समोर गाजरांचा ढिग दिसला. ‘जाऊ दे, निदान गाजरं तरी खाऊ!’ असं म्हणत, त्यांनी गाजरं खायला सुरुवात केली. पण बंटी आणि बनीने त्याला बिब्ब्याचं तेल लावुन ठेवलं होतं. त्यामुळे दोघांचेही चेहरे सुजायला लागले. आणि भोपळ्यासारखे टम्म फुगले. त्यांचे अवतार बघून बंटी आणि बनी हसत हसत बाहेर आले. ‘काय कराल परत चोरी? खाल माझ्या शेतातलं धान्य?’ बंटीने हसत हसत विचारलं. ‘नाही. कधीच नाही.’ चिंची आणि मोन्या काकुळतीला येऊन म्हणाले. शेवटी बंटी आणि बनीने त्यांना शेतातुन हुसकावून लावलं. आणि त्यानंतर ते परत वनराईत कधीच दिसले नाही.
Short Story In Marathi -: वेंधळी परी
‘पिक्सी’ नावाचं जादूचं राज्य होतं. त्यात खूप सा-या प-या रहायच्या. जादुगार रहायचे, चांगल्या चेटकिणी रहायच्या. खूप अद्भूत होतं ते राज्य. त्या राज्यात जादूच्या शाळा होत्या, बागीचे होते. इतकच काय जादूची घरं आणि बाजारही होते. राज्यातल्या सगळ्या प-या, छोटे छोटे जादुगार रोज शाळेत जादू शिकण्यासाठी जायचे. तिथे अभ्यास करायचे, खेळायचे, मस्ती करायचे. त्या राज्यात चिंगी नावाची परी रहायची. छोटासा पिवळा फ्रॉक, दोन वेण्या आणि इवलेसे पंख असलेली चिंगी दिसायला खूप गोड होती. तिचे डोळे घारे होते, गाल गुलाबी होते आणि ओठ तर छान लालचुटूक होते. ती स्वभावानेही बिचारी गरीब होती. पण चिंगी खूप वेंधळी होती. कुठलीच गोष्ट ती नीट करत नसे. तिला कुठलही काम सांगितलं तर ते तिच्याकडून धड होत नसे. शाळेत तर दरदिवशी कुठलं ना कुठलं पुस्तक ती विसरलेली असायची. कधी कधी तर खाऊचा डबाच न्यायला विसरायची. चिंगीची आई तिला खूप समजवायची. ‘अगं चिंगी इतकं वेंधळही असू नये गं!’ पण चिंगीच्या डोक्यात मात्र काही प्रकाश पडत नसे.
‘पिक्सी’मध्ये चेटकिण आजीबाई पण रहायच्या. त्या खूप प्रेमळ होत्या. लहान प-यांना, छोट्या जादुगारांना त्या खाऊ द्यायच्या. राज्यातल्या प-यांना, जादुगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या. आपल्या मंत्रांनी त्यांना बरं करायच्या. सगळ्यांचे लाड करायच्या. सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या त्या. प-या त्यांना ‘चेटकिण आजी’ म्हणायच्या. चिंगीच्या तर त्या फार आवडत्या होत्या. शाळा सुटली की ती पहिले चेटकिण आजीच्या घरी जायची, आजीच्या हातचा खाऊ खायची आणि मगच घरी जायची.
एकदा काय झालं, चिंगी आपली रमत गमत बाजारातुन चालली होती. तेवढ्यात तिला चेटकिण आजीने हाक मारली. त्याचं काय झालं, चेटकिण आजी चालली होती दुस-या राज्यात औषधाचं जिन्नस आणण्यासाठी. पण तिला नेमका झाला होता उशीर. त्यात तिला मध्ये बरीच कामं उरकायची होती. पण आता वेळ कुठे होता. तेवढ्यात आजीला चिंगी चाललेली दिसली. ‘अगं ए चिंगी…’ आजीने हाक मारली. चिंगीने आजीची हाक ऐकली आणि गेली आजीकडे. ‘काय झालं गं आजी? आणि तु कुठे चालली आहेस, एवढं सामान घेऊन?’ चिंगीने तिच्या हाताल्या वेगवेगळ्या पिशव्या बघून आजीला विचारलं. ‘अगं मी जरा चाललेय दुस-या राज्यात, औषधाचं जिन्नस आणायला. पण माझी काही कामं करायची आहेत. तु करशील?’ आजीने विचारलं. ‘हो करेन की!’ चिंगी मोठ्या उत्साहात म्हणाली. ‘बघ हं, पण कुठेही वेंधळेपणा करायचा नाही. आणि सगळी कामं केलीस की मग तुला मोठीच्या मोठी बेरी मिळेल. कबुल?’ आजीने चिंगीला विचारलं. पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायलाच लागली. ‘हो आजी. नक्की करेन. तु सांगुन तर बघ ना मला कामं.’ चिंगी म्हणाली. मग आजीने चिंगीच्या हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या. आणि सांगितलं, ‘हे बघ चिंगी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी जिन्नसं आणि वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या आहेत. नीट ने.’ पण चिंगीने तिची सुचना काही नीट ऐकलीच नाही. ‘हो गं आजी. देईन मी नीट.’ चिंगी हसत म्हणाली. आणि आजी चिंगीचा निरोप घेऊन दुस-या राज्यात जाण्यासाठी निघाली.
चिंगीने पाहिलं काय तर, त्यात वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या. पिवळी, निळी, लाल, जांभळी, हिरवी आणि चंदेरी अशा एकूण सहा थैल्या होत्या. चिंगीने एकेक यादी वाचायला सुरुवात केली. त्यात एकूण सहा गोष्टी होत्या. सॅमी जादुगाराला ‘ब्लु बेरीं’चा रस करण्यासाठी मंत्रांची एक पिवळी थैली द्यायची होती, भूभू कुत्र्याला त्याच्या आजारी पिल्लुसाठी औषधाची लाल थैली द्यायची होती, जादुच्या पूस्तकाचं वाचनालय चालवणा-या राजू नावाच्या छोट्या जादुगाराला, पुस्तकं नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता, तो होता जांभळ्या पिशवीत तर बंटी सशाला गाजरं मोठी करण्यासाठी काही औषधं हवी होती ती होती निळ्या पिशवीत, मॅडी नावाच्या एका परीने आपल्या डिंकाच्या झाडातुन अजुन डिंक येण्यासाठी औषध मागवलं होतं, जे होतं हिरव्या थैलीत आणि डिक्सी नावाच्या चेटकिणीला पाऊस पाडण्यासाठी ढग आणि वीजा हव्या होत्या आणि त्या होत्या चंदेरी पिशवीत.
‘हॅ! फक्त सहाच गोष्टी तर आहेत. त्या काय माझ्या पटकन देऊन होतील.’ चिंगी मोठ्या मिजासीत म्हणाली. आणि तिने पहिलं नाव वाचलं. ‘सॅमी जादुगार’. चिंगीने नाव वाचलं खरं पण त्याला नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची, ते मात्र काही वाचलं नाही. शेवटी वेंधळी चिंगीच ती! ती गेली सॅमी जादुगाराकडे. पाठीवरुन तिने एक थैली काढली. ती होती निळ्या रंगाची. जादुगाराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचताच चिंगीने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली. मग ती गेली भूभू कुत्र्याकडे, त्याचं पिल्लू आजारी होतं बिचारं, त्याला चिंगीने हिरवी थैली दिली. राजूला दिली चंदेरी पिशवी, बंटी सशाला दिली पिवळी थैली, मॅडी परीला दिली लाल पिशवी आणि डिक्सी चेटकिणीला दिली जांभळी पिशवी.
चेटकिण आजीने सांगितलेली सगळी जिन्नसं चिंगी देऊन आली. तिचं हे काम होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती. चेटकिण आजी येण्याची वेळ झाली होती. चिंगीला वाटलं ‘अरे वा काय काम केलय आपण. आता आपल्याला मोठी बेरी नक्की मिळणार.’ ती चेटकिण आजीच्या येण्याची वाट बघत बसली. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. चिंगीला चेटकिण आजी दुरुन येताना दिसली. चिंगीने पटकन जाऊन आजीला तिने सगळी कामं केल्याचं सांगितलं. चिंगीने सगळी कामं केली हे ऐकुन आजीलाही खूप बरं वाटलं. ‘चल, आता तुला मी मोठी बेरी देते.’ आजी म्हणाली. तेवढ्यात सॅमी जादुगार, भूभू कुत्रा, बंटी ससा, राजू छोटा जादुगार, मॅडी परी, डिक्सी चेटकिण आजीच्या समोर येऊन उभे राहिले. ते सगळे रागावलेले दिसत होते. त्यांनी विचारलं, ‘आजीबाई तुम्ही कुठला मंत्र दिलात आम्हाला?’ ‘का? काय झालं?’ आजीने मोठ्या आश्चर्याने विचारलं. ‘मला ब्लु बेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता. पण माझ्या ब्लु बेरींचा रस निघण्याऐवजी त्या चांगल्या अजुनच मोठ्या झाल्यात.’ सॅमी चिडून म्हणाला. ‘माझी पिकं मोठी होण्याऐवजी त्याचा रस निघाला.’ बंटी ससा म्हणाला. ‘माझ्या पिल्लुची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातुन अजुन शेंबुड गळायला लागला.’ भूभू सांगत होता. ‘माझ्या तर झाडाने डिंक देणच बंद केलय आता.’ मॅडी चिडून म्हणाली. ‘माझी पुस्तकं पावसामुळे भिजली.’ राजूने सांगितलं. ‘आणि माझ्या इथे तर पाऊस काय, साधे ढगही आले नाही.’ डिक्सीने रागावून म्हटलं. त्यांच्याबाबतीत एवढं झालेलं बघून आजीला खूप आश्चर्य वाटत होतं. ‘कुठल्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला?’ आजीने विचारलं. प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या पिशव्याचे रंग सांगितले. आणि मग झालेला सगळा प्रकार आजीच्या लक्षात आला. चिंगीने सगळा घोळ घातलेला आहे, हे आजीच्या लक्षात आलं. चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या. त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती, ती मात्र त्यांना मिळालीच नाही. चिंगीने घातलेला सगळा घोळ पाहून सगळेजण तिला खूप रागावले. तिच्या वेंधळेपणामूळे सगळ्यांचच नुकसान झालं होतं. ‘काय चिंगी करणार का परत वेंधळेपणा?’ आजीने चिंगीचा कान पिळत तिला विचारलं. ‘ मला माफ करा. मी असा वेंधळेपणा करणार नाही. परत कधीच करणार नाही.’ चिंगी रडत रडतच म्हणाली. मग चेटकिण आजीने एक मंत्र म्हणून सगळ्यांचं नुकसान भरुन दिलं. हं! पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली, खूपच सुधारली. आणि तिने वेंधळेपणा कायमचा सोडून दिला.
नक्की वाचा: Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi
Short Story In Marathi -: अख्खी म्हैस पाच रुपयात
एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, ‘आपली म्हैस गावातल्याच दोन-तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस-चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.’
मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, ‘ऎका हो ऎका ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणार्यास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन.’ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली.
तो मनात म्हणाला, ‘आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा ‘तुझी म्हैस मला रानात मिळाली,’ असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं.’ असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले.
यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, ‘माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, ‘ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच-सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ?’म्हशीचा मालक म्हणाला, ‘छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.’म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.
Short Story In Marathi -: चतुर सुना
जपानमधील एका गावात राहणाऱ्या फांग फू नावाच्या शेतकर्याला दोन मुलगे होते. दोघांचीही लग्न झाली होती. एकदा त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता, त्यांनी त्याला विचारलं, ‘मामंजे ! आम्ही तुमच्यासाठी काय आणू?’तो शेतकरी मोठया सुनेला म्हणाला, ‘ तु कागदातून अग्नी आण.’ तिन होकार देताच तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, ‘ तु कागदातून वारा आण.’ धाकटया सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले.
त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. पंधराएक दिवस माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतकर्याने मोठया सुनेला विचारलं, ‘चिंगची ! आणलास का तू कागदातून अग्नी ?’यावर ती सून आतल्या खोलीत गेली, आणि थोड्याच वेळात, आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठया सुनेनं मोठया युक्तीनं आश्वासन पुर्ण केल्याचा त्याला आनंद झाला.
त्यानंतर त्या शेतकर्यानं धाकटया सुनेला विचारलं, ‘मिंगजी ! कागदातून वारा आणलास का?’कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सासर्याच्या हाती देऊन ती, त्याला म्हणाली, मांमजी ! हा पंखा हाती घेऊन हलवीत रहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे या गोष्टीची तुम्हाला प्रचीती येईल.’दिलेलं आश्वासन धाकटया सुनेनही अशा तर्हेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी अंतरी संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला.
Short Story In Marathi -: ओले हात
एकदा जपानच्या बादशहाने आपल्या राजसभागृहात, आपल्या राज्यातील सर्व लहान- मोठया अधिकार्यांची सभा घेतली. सभेला उद्देशून तो म्हणाला, ‘ मी लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना, राज्याचा कायापालट का होत नाही ? बघावं, तर प्रजा त्याच दारिद्रयात, त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे. हे असं का व्हावं ?’
बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहिना. अखेर स्पष्टवक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिध्द असलेल्या विंगचॅंग या आधिकार्याकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळविली. तेव्हा विंगचॅंग याने प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळाएवढा मोठा गोळा मागवून घेतला व तो बादशहाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला, ‘महाराज ! हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे, पाहिलंत ना ? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुध्द बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहातो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकार्याकडून मागल्या रांगेतल्या अधिकार्याकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकार्याकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा, मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो.’बादशहाने त्याप्रमाणे केले.
त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंत्र्याच्या हाती दिला. मंत्र्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारभार्याच्या हाती दिला. त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हाधिकार्याकडे, त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधीकार्याकडे, त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता, जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिकार्याचे हात ओले करीत करीत, सर्वांत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारीएवढा होऊन गेला होता !
तो सुपारीएवढा खडा हाती येताच, तो स्पष्टवक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिध्द असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला, ‘महाराज, आपण मंत्र्याच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता, आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला, हे प्रत्यक्ष पाहिलंच ना ? तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोककल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठया रकमा मंजूर करता, आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपर्यंत प्रत्येक अधिकारी आपले हात ‘ओले ‘ करुन घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे रहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा ? आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा ?’
Short Story In Marathi -: चोरावर मोर
रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.
हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोर्या करायला लावील,’ असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणार्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?’
तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.’
तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.’
त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलिसठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.
Short Story In Marathi -: स्वच्छतेचा वसा
गणपतचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी रमणने त्यांच्याच शेजारी नवी खानावळ सुरु केली आणि गणपतची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी गणपतचा मित्र राम त्याच्याकडे आला तर गणपत एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच गणपतने त्याला सर्व हकीकत सांगितली.
त्यावर राम त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. माझ्या ओळखीच्या एका तरुणाने अगदी सुंदर सुशिक्षित मुलगी नाकारली केवळ तिने विटलेली साडी नेसली होती आणि केस बांधले नव्हते या कारणामुळे. तू पण तीच चूक करतो आहेस, त्या मुलगीसारखा. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो रमणच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. गणपतला आपली चूक उमगली.
Short Story In Marathi -: समुद्र आणि नदया
एक पंडित मोठा गर्विष्ठ होता, तो आपल्या विदयार्थ्यांस एके दिवशी तत्त्वज्ञान शिकवीत असता, एका विदयार्थ्याने त्यास सहज थट्टेने प्रश्न केला, ‘गुरुजी, अगस्ति ऋषिंनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे, तर हे गोष्टी शक्य आहे काय ?’ पंडिताने मोठया आढयतेने उत्तर दिले, ‘शक्य आहे; इतकेच नव्हे तर मी स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवितो; आणि जर मी तसे केले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन.’ अशी पैज ठरल्यावर काही वेळीने पंडित शुध्दीवर आला आणि आपण भलत्याच गोष्टी संबंधाने पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. मग तो कालिदासाकडे गेला आणि पैजेची गोष्ट त्यास सांगून म्हणाला, ‘ह्या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन.’ पंडिताच्या मूर्खपणाबद्दल कालिदासास त्याची दया येऊन त्याने त्यास मदत करण्याचे कबूल केले.
दुसऱ्या दिवशी पंडित, त्याचे विदयार्थी, कालिदास व गावातले पुष्कळ लोक समुद्रावर गेले. कालिदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने पुष्कळसे तांबे बरोबर आणले होते. ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाबद्दल लोक फार आश्चर्यचकित झाले व तो काय करतो, याची ते मोठया उत्कंठेने वाट पाहात बसले. पुढे काय करावयाचे ते कालिदासाने त्याला पूर्वीच सांगून ठेवले होते.
त्याप्रमाणे, ज्या विदयार्थ्याबरोबर त्याने पैज लावली होती, त्याजकडे पाहून तो म्हणाला, ‘अरे, ठरल्याप्रमाणे समुद्राचे सगळे प्राणी पिऊन टाकण्यास मी तयार आहे; परंतु ज्या शेकडो नदया समुद्रास येऊन मिळाल्या आहेत, त्यांचे पाणी समुद्रात सारखे वाहात राहिले आहे, ते पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का ? नुसते समुद्रातले पाणी पिण्याचे मी कबूल केलेले नाही, हे तुला ठाऊकह आहे.’ हे भाषण ऐकून तो विदयार्थी निरुत्तर झाला व पंडिताच्या चातुर्याबद्दल सगळ्या लोकांनी त्याची फार तारीफ केली.
तात्पर्य: समयसूचकता हा गुण प्रसंगी मोठमोठया संकटांतून मनुष्याची मुक्तता करतो.
Short Story In Marathi -: कोल्हा आणि द्राक्षे
एकदा कोल्हा खाण्याच्या शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला. वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते. ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी कुठे खायला मिळेल का, हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले.
कोल्हा उद्या मारीत द्राक्षे खाण्याच्या प्रयत्न करू लागला. बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात. उद्या मारून मारून त्याचे अंग दुखू लागले. तो बाजूला झाला आणि म्हणाला, नाही तरी मला नकोतच ती द्राक्षे! कच्ची, हिरवीगार आणि आंबट आहेत. ज्या कोणाला हवी असतील, त्यांच्यासाठी मी ती तशीच ठेवून जातो.
Short Story In Marathi -: बहिरी ससाणा आणि कोंबडा
एक शेतकऱ्याचा एक कोंबडा होता, त्यास एके दिवशी असे समजले की, ‘आज आपला धनी आपणास मारून खाणार.’ मग तो आपण शेतकर्याच्या हाती न सापडावे म्हणून इकडेतिकडे लपून बसू लागला.
आपल्या बरोबरीच्या कोंबडयांच्या माना कापताना आपल्या धन्यास त्याने पुष्कळ वेळा पाहिले होते व तेव्हापासून त्याला मोठी दहशत बसली होती. त्याला जवळ बोलावून त्याची मान कापावी, या हेतूने त्या शेतकऱ्याने पुष्कळ गोड शब्द बोलून व धान्य दाखवून त्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कोंबदा पूर्वीच सगळे जाणून असल्यामुळे, त्याच्या गोड बोलण्यास भुलून फसला नाही.
जवळच एका पिंजर्यात त्या शेतकर्याचा बहिरी ससाणा होता, त्याने जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तो कोंबडयास म्हणतो, ‘अरे, तू किती मूर्ख आणि कृतघ्न आहेस ! आपल्या धन्याने मारलेली हाक ऐकल्याबरोबर त्याच्याजवळ जाऊन तो काय म्हणतो ते ऐकून घेणे हे तुझे कर्तव्य नाही काय ? या बाबतीत माझे वर्तन कसे आहे, हे लक्षात घे. मला दुसरी हाक मारण्याचा प्रसंग आपल्या धन्यास मी कधीही येऊ देत नाही, हे तू पाहिलेच आहेस.’
कोंबडा उत्तर करतो, ‘खरेच ! पण मजप्रमाणे तुझी मान सुरीने कापून, तुझ्या मांसाचे तुकडे तव्यावर भाजून खावे, या उद्देशाने जर धन्याने तुला जवळ बोलाविले, तर तू मजप्रमाणेच लपून बसशील, याबद्दल मला बिलकुल संशय वाटत नाही. ’
तात्पर्य: परिस्थितीप्रमाणे मनुष्याच्या वर्तनात बदल व्हावा हे साहजिकच आहे.
Short Story In Marathi -: हंस कोणाचा
भगवान गौतमबुध्दांच्या बालपणीची गोष्ट. दहा अकरा वर्षाचं वय होतं त्या वेळी त्यांचं आणि ते तेव्हा त्यांच्या मूळ ‘सिध्दार्थ’ या नावानंच ओळखले जात होते.एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता-बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजलं, आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नतंर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडं बरं वाटू लागलं.
तेवढ्यात सिध्दार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, ‘सिध्दार्था, या हंसाला बाण मारुन मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर.’सिध्दार्थ म्हणाला, ‘देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जिवाचं रक्षण करणाऱ्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, तेव्हा हा हंस आता माझाच आहे..’
अखेर देवदत्त हा सिध्दार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्था विरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही ऎकून घेतलं. त्यानंतर ते सिध्दार्थला म्हणाले, बाळ ! एकून धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलसं म्हणून हा हंस तुझा आहे हे खरं असलं, तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पुर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होता. या हंसाला देवदत्तानं घायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो.’
यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, ‘महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणानं अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्या नाही काय ?’बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दीतेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मलाच कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ.’
न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले, आणि तिथून परस्परविरुध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तानं टाळी वाजवून ‘ये,ये,’ म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं, पण त्या हंसानं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच ‘ये’ म्हणताच, तो जखमी हंस मोठया कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला !तो प्रकार पाहून न्यायमुर्ती म्हणाले, हंस कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्न उरत नाही.’
Short Story In Marathi -: आई ती आई
मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?’ हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, ‘ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.’
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, ‘महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?’ त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, ‘हे बालक या बाईचंच आहे. ‘त्याला कापण्यात यावं, ‘असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.’
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
Short Story In Marathi -: कुणाला कमी समजू नये
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.
त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.
पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते.
तात्पर्य : कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.
Short Story In Marathi -: मांजराच्या गळ्यात घंटा
एका किराणामालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुका मेवा, बिस्किटे आदी वस्तूंवर ते ताव मारायचे. अशा खादाड उंदारांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदारांने विचार केला की या उंदारांचे काहीतरी करायलाच हवे. नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल.
हा विचार करत दुकानदाराने एक दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलवली.
सभेत याच्यावर वरीच चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरूण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे.
सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान हं मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदरांला स्वतःच्या हुषारीचा फार अभिमान वाटला.
तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली.
उपदेश : अमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.
Short Story In Marathi -: राक्षस, चोर आणि ब्राह्मण
एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.
चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?’ अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.
झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब!
मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू! तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?
राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.
त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.
तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.
Short Story In Marathi -: ससा आणि कासव
एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.
कासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल?
सस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.
कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.
एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.
कासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.