Stories In Marathi | 20+ मराठी बोधकथा | Short Stories with Moral for Kids

Stories In Marathi : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories in marathi, सुंदर छान छान मराठी गोष्टी, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

Stories In Marathi | छान छान मराठी बोधकथा 

चल रे भोपळया टुणुक टुणुक

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.

ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली .

ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. थोडया दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ‘ चल रे भोपळया टुणुक टुणुक’. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.

थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे थांब!’ आतून म्हातारी म्हणाली ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

पण म्हातारी आतून म्हणाली ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक!’. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोहोचली.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

उंदराची टोपी

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’

शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

बुडबुड घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली.

मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली तुम्ही जा मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात.

मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते .तेवढी खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली.पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’

मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली.

मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

तात्पर्य – नेहमी खरे बोलावे

कावळा – चिमणीची गोष्ट

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती.

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले.

कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.

तात्पर्य – लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.

कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस

एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला.

एक होती कामसू चिमणी. पहिल्या गोष्टीत पाहिली ना घर स्वच्छ ठेवणारी? तीच ती. ती लोळ लोळ लोळली. तर मोत्याने भरली. तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला. तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली. ती देवळात गेली तर तिला साडी-चोळी मिळाली. ती साडी-चोळी नेसली, पालखीत बसली अन् घरी येऊन झोपी गेली.

तात्पर्य – लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही.

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.

नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.

मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’

तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.

प्रमाणिक लाकुडतोड्या

ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुडतोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो.

त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?’ लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.

सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी, ‘ ही माझी कुऱ्हाड नाही.

मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ‘ हे देखील नाही ‘. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो ‘ होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता!’
देवी म्हणते तुझा प्रामाणिक पणा मला आवडला’ या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला.प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो.

तात्पर्य – नेहमी खरे बोलावे.

ससा आणि कासवाची गोष्ट

ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,”किती रे तु हळू” ” कासव म्हणालं, ”पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.

सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ”मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत” कासवं म्हणालं ” हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?” ससोबा म्हणाला, ” ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.”

शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,” हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.” ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,” बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. ” ससा म्हणाला,” ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.”

रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला.

कासव अजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी पाहिलीच नव्हती.

पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली.

ते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वतःशीच तणतणू लागले ” पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.” कासव म्हणाले, ” ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.” खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.

तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते.

मुंगी व कबुतर

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली.

पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.

त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले. अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.

तात्पर्य – संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र

दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ.

एका जंगलात एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.

गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला.

म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले.

एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघ भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे उशीरा त्याच्या लक्षात आले.

तात्पर्य -दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ

दुष्‍ट कोल्‍ह्याला शिक्षा

एक उंट जंगलात चरण्‍यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्‍ट कोल्‍हा त्‍याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्‍याने उंटाला विचारले,”काका, रोज गवत खाऊन तुम्‍हाला कंटाळा येत नाही का?” उंट म्‍हणाला,”बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?” तेव्‍हा कोल्‍हा म्‍हणाला,” मी तर रोज जवळच्‍याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्‍या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.” उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्‍ह्याला त्‍याने तेथे नेण्‍यासाठी विनंती केली.

उंट कोल्‍ह्यासोबत शेतात गेला. कोल्‍ह्याने आधी जाऊन स्‍वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्‍ह्याने मग जोराने कोल्‍हेकुई सुरु केली. कोल्‍ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्‍याचे चार गडी शेतात घुसले. त्‍यांना पाहताच कोल्‍ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्‍यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.

त्‍याला मार खाताना पाहून कोल्‍ह्याला खूप आनंद झाला. या गोष्‍टीला काही दिवस गेले. कोल्‍ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्‍हा शेतात नेले व पुन्‍हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्‍यालाच मार पडतो ही गोष्‍ट आता उंटाच्‍या लक्षात आली व त्‍याने कोल्‍ह्याची खोड मोडण्‍याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्‍ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्‍यांना बाहेर काढण्‍याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्‍हा कोल्‍ह्याची वेळ आली तेव्‍हा उंटाने मुद्दामच जास्‍त खोल पाण्‍यात नेऊन डुबकी मारली. कोल्‍हा पाण्‍यात पाण्‍यात बुडून मरण पावला.

तात्‍पर्य : करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते.

बासरीवाला मुलगा आणि गावकरी

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उंदीरच उंदीर.

त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही.

ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते. तो या गावात येतो व गावकर्‍यांना सांगतो, की मी या उंदराचा बंदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या. गावकरी तयार होतात. मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो.

त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात. व त्याच्यामागे धावू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात. आणि पाण्यात बुडून मरतात..

बासरीवाला गावकर्‍यांना आपली बिदागी मागतो. मात्र, गावकरी शंभर सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला गावकर्‍यांची लबाडी कळून येते.

तो म्हणतो ठिक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते पहा. तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो. या वेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकर्षली जातात. ती त्याच्या मागे धावू लागतात.

गावकर्‍यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर सुवर्णमुद्रा देतात.

तात्पर्य : उपकार करणार्‍याशी कृतघ्न वागू नये.

आति तिथे माती

एक गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे.त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं.भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता.

देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला ‘तुला काय हवे ते मग’भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या .देव म्हणाला ‘मोहरा कशात घेणार?” भिकाऱ्याने झोळी पुढे केली.मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला’मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल.

पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल .भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली .देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भारत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना.

मोहरांच्या वजनाने झोळी फटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता .शेवटी जे व्हायचे तेच झाले.त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते.

त्याच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरात नाही.आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो.

तात्पर्य – कोणत्याही गोष्टीचा आति लोभ करू नये.

कष्टाचे फळ

एक गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.

त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांच्या संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचवते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलावितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाणयांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.

दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांना सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही .मग त्यांनी विचार केला की एवढे शेत कानाला आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले.

त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरगोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यामाना भरपूर धन मिळाले.

गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले,’मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’

तात्पर्य- कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

बुड घागरी

बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणतो दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी.

ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’ मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही.

मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

तात्पर्य :-सत्य कधी लपत नाही

अहंकारी राजाला धडा

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे.

त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या” पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला.

राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला, “राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही. पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले, ” महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात.

तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.” एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.

तात्पर्य :- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.

पक्षी आणि पारधी

एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ यावर पारधी म्हणाला, ‘तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्‍हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.’ पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला.

ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, ‘यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्‍न करेल. त्यावर तुम्ही विश्‍वास ठेऊ नका.’ हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, ‘अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !’

तात्पर्य – लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्‍याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वार्‍यालाही उभे रहात नाहीत.


मित्रानो तुमच्याकडे जर मराठी बोधकथा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही ते या Stories In Marathi  या article मध्ये Upadate करू, मित्रांनो हि Short Stories with Moral for Kids जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Short Stories with Moral for Kids Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या inmarathi.in

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

इंटरनेट म्हणजे काय आणि त्याचे महत्व | What is internet ?

Jahirat lekhan in marathi | जाहिरात लेखन

{Best} marathi grammer | मराठी व्याकरण

Leave a Comment