Story In Marathi Akbar Birbal | अकबर बिरबलाच्या गोष्टी मराठी मध्ये

Story in marathi akbar birbal : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories in marathi, सुंदर छान छान अकबर बिरबलाच्या मराठी गोष्टी, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. 

चतुर बिरबल

एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.

बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.

दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठया पाहिल्या.

त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.’

शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले.

तात्पर्य – करावे तसे भरावे.

बिरबल काळा कसा झाला

बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती.
बरेच लोक माणसाच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला वाटत होते की दरबारातील दरबाऱ्यांचे आकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे परंतु काही विचार करून तो गप्प राहीला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोडयाचे वेळात बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले, ‘महाराज! आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात?’
अकबर बोलला, ‘लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरूपता आहे, त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला.’
बिरबल बोलला, ‘मला खेद वाटतो की, आत्तापर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही.’ बादशहा बोलला सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार. जर तुला कुरूपतेचे कारण माहीती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम दूर कर.
बिरबलने उत्तर दिले, ‘महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीचा निर्माणाला सुरूवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्व प्रथम रूप, दुसर धन, तिसरे बुध्दी, आणि चौथे बल प्रदान केले.
चारी गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुध्दी घेण्यात राहून गेलो जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुद्धीच घेऊन राहून गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालच मध्ये होते. याच कारणामुळे मी कुरूप राहून गेलो. बिरबलचे हे उत्तर ऐकून बादशहा अकबर आणि दरबाऱ्यांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलची मजाक कधीच केली नाही.

बिरबल सापडला

एकदा, एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला.

परंतु, काही दिवसांतच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करत असे. परंतु, बिरबलचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली. त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटविली की, ‘जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठया रकमेचे बक्षिस दिले जाईल.’

हया दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरे दयावी तेही सांगितले.
बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला, ‘ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाडयात जा. जाताना चुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दे.’
बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाडयाकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षिस घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले.
तो राजदरबारात त्याच पध्दतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, ‘कोण आहेस तू?’
‘मी एक माणूस आहे.’ तो बोलला.
‘अच्छा! मग तू असा डोक्यावर खाट ठेऊन का आला आहेस?’ अकबरने विचारले. तो बोलला, ‘महाराज! ही तुमचीच घोषणा आहे, की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षिस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सुर्यप्रकाशातही नाही.’

त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर बोलला ‘हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे?’ तो म्हणाला, ‘महाराज! ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी खूप भूकेलेला आहे.’

हे सर्व ऐकून अकबर कुतुहलाने बोलला, ‘सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकविले?’ ‘महाराज! काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विव्दान व्यक्ती रहात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे.’ तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला.

अकबरला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, ‘मला बिरबल सापडला!’ त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षिस दिले. त्याने
आपले काही दूत त्या गावात पाठविले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले.

कोंबडीचे अंडे

बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की.बिरबलची मजाक करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुध्दा अकबर स्वतःला थांबवू शकत नसे व कधीकधी बिरबलची मजाक करत असे.
एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना एक एक कोंबडीचे अंडे दिले व त्यांना बिरबला बरोबर करण्याच्या गंमती बद्दल योजन सांगितली.
नेहमीप्रमाणे जेव्हा बिरबल दरबारात आला तेव्हा अकबर त्याला म्हणाला, ‘काल रात्री मला एक स्वप्न पडले त्यात एका ऋषींनी मला सांगितले की, जे दरबारी बागेतील तलावात जातील व तलावातून आपल्या बरोबर हातात अंडे घेऊन येईल तेच माझ्यासाठी निष्ठावंत असतील. तरी आता सर्वांनी तलावात जाऊन त्यातून एक एक अंडे आणावे.’
त्यानुसार, सर्व दरबाऱ्यमधून एक एक दरबारी तलावातील पाण्यात डुबकी मारून आपल्या बरोबर एक अंडे घेऊन बाहेर येत होते. शेवटी आता बिरबलचा नंबर होता.
बिरबलने तलावात उडी मारली परंतु अंडे सापडण्यात तो अयशस्वी झाला. त्याला त्वरीत लक्षात आले की ही अकबरची माझ्यासोबत गंमत करण्याची योजना आहे.
बिरबल तलावाच्या बाहेर येताच कोंबडयाच्या आवाजात ओरडु लागला. कोंबडयाच्या त्या आवाजामुळे अकबर संतप्त झाला. तो बोलला, ‘तू वेडा झाला आहेस का? तलावातून प्रत्येक जण आपल्या सोबत अंडे घेऊन आला परंतु तुझ्या हातात अंड नाही. असे का?’
बिरबल बोलला ‘महाराज! फक्त कोंबडयाच अंडे घालू शकतात. मी तर कोंबडा आहे.’
अकबरने दरबाऱ्यांकडे बघितले व चोरून हसला. व दरबाऱ्यांनी गोंधळून आपले हात एकमेकांवर मारले.

जितकी लांब चादर तितकेच पाय पसरावे

अकबरच्या दरबाऱ्यांची नेहमीच एक तक्रार असे की बादशाह नेहमी बिरबललाच बुध्दीमान मानतात बाकीच्यांना नाही.
एक दिवस अकबरने सर्व दरबाऱ्यांना दरबारात बोलविले आणि दोन हात लांब व दोन हात रूंद चादर त्यांच्याकडे देत म्हणाले, ‘या चादरीने तुम्ही लोकं मला डोक्यापासून तर पायापर्यंत झाकून दाखवा तर मी तुम्हाला बुध्दीमान मानेल.’
सर्व दरबाऱ्यांनी प्रयत्न केला परंतु ते त्या चादरीने अकबरला पूर्णपणे झाकू शकले नाही. डोके झाकले तर पाय बाहेर रहायचे, आणि पाय झाकले तर डोके चादरीच्या बाहेर रहायचे.
आडवे, उभे, तिरपे सर्व प्रकारांनी प्रयत्न करून देखील कोणालाही त्यात यश आले नाही.
आता अकबरने बिरबलला बोलविले व तीच चादर त्याला देत स्वतःला त्यात झाकून दाखविण्यास सांगितले.
जेव्हा अकबर खाली झोपला तेव्हा बिरबलने अकबरचे पसरलेले पाय मुडपण्यास सांगितले. अकबरने बिरबलने सांगितल्याप्रमाणे पाय मुडपले आणि बिरबलने अकबरला आता डोक्यापासून पायापर्यंत चादरीने झाकले.
सर्व दरबारी आश्चर्याने बिरबलकडे बघत होते. तेव्हा बिरबल बोलला, ‘जेवढी लांब आपली चादर असेल तेवढेच आपण पाय पसरावेत.’

अकबर बादशहाचे स्वप्न

एका रात्री, अकबर बादशहाने एक विचित्र स्वप्न बघितले की त्याचा एक दात सोडून बाकी सगळे दात पडले आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने राज्यातील सर्व विख्यात ज्योतिष्यांना बोलविले आणि त्यांना आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारला. सर्व ज्योतिष्यांनी आपापसात विचार विनिमय करून एकमत होऊन बादशहांना सांगितले, ‘महाराज, याचा अर्थ असा आहे की तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आधी मरून जातील’.
हे ऐकून बादशहा खूप रागवतो आणि सर्व ज्योतिष्यांना दरबारातून निघून जाण्यास सांगतो. त्यांच्या जाण्यानंतर बादशहा बिरबलला बोलवून आपल्या स्वप्नाबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारतो.
काही वेळानंतर बिरबल बोलतो ‘महाराज, आपल्याला पडलेले स्वप्न अत्यंत शुभदायक आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक काळ जगणार आहात’.
बिरबलने हुशारीने सांगितलेल्या अर्थामुळे महाराज खुश झाले आणि बिरबलला उत्तम बक्षिस दिले.

थोडक्यात उत्तर

एक दिवस, बिरबल बागेत फिरत असताना सकाळच्या ताज्या हवेचा आनंद घेत होता की अचानक एक माणूस त्याच्या जवळ येऊन बोलला ‘तुम्ही मला सांगू शकता की बिरबल कुठे मिळेल?’
‘बागेत.’ बिरबल बोलला.
तो माणूस काहीवेळ थांबला आणि बिरबलला बोलला ‘तो कुठे राहतो?’
‘त्याच्या घरात.’ बिरबलने जोरात उत्तर दिले.
तो माणूस अजून काही वेळ थांबला. थोडा वैतागून त्याने पुन्हा विचारले ‘तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता का देत नाही?’
‘कारण तुम्ही मला त्याचा पूर्ण पत्ता विचारलाच नाही?’ बिरबलने आणखी जोरात उत्तर दिले.
‘तुम्हाला लक्षात येत नाही का, मी काय विचारू इच्छित आहे ते?’ त्या माणसाने पुन्हा प्रश्न केला.
‘नाही.’ बिरबलने उत्तर दिले.
तो माणूस काही वेळ शांत राहिला, बिरबलचे फिरणे चालूच होते. त्या माणसाने विचार केला की, मी असे विचारले पाहिजे की तू बिरबलला ओळखतो का? तो माणूस पुन्हा बिरबलच्या जवळ गेला आणि बोलला ‘बस, मला तू फक्त इतके सांग की तू बिरबलला ओळखतो का?’
‘हो, मी ओळखतो.’ बिरबल उत्तरला.
‘तुझे नाव काय आहे?’ त्या माणसाने विचारले.
‘बिरबल.’ बिरबलने उत्तर दिले.
तो माणूस चकित झाला. तो बिरबललाच इतक्या वेळापासून बिरबलचा पत्ता विचारत होता आणि बिरबल होता की जो स्वतःहून स्वतःबद्दल सांगत नव्हता की तो बिरबल आहे. त्याच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती.
‘तू किती मजेदार माणूस आहेस!’ असे बोलत तो माणूस काहीसा त्रासदायक दिसत होता, ‘मी तुला तुझ्याबद्दलच विचारत होतो, आणि तू काहीतरी वेगळेच सांगत होतास’ सांग, तू असे का बरे केले?
‘मी फक्त तू विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली.’ बिरबल बोलला.
बिरबलची हुशारी आणि चातुर्य बघून त्या माणसाला हसू आले. तो माणूस म्हणाला ‘त्याला त्याच्या काही घरगुती समस्या सोडविण्यासाठी बिरबलची मदत घ्यायची होती’ त्यावर बिरबलने मदतीसाठी होकार दिला.

साखर आणि माती

एक दिवस, बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.
बादशहाने विचारले – ‘या बरणीत काय आहे?’
दरबारी बोलला ‘यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे.’
‘ते कशासाठी?’ अकबर बादशहाने पुन्हा विचारले.
‘माफी असावी, महाराज’ दरबारी बोलला. ‘आम्ही बिरबलच्या बुध्दिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो, आमची अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाणान दाणा वेगळा करावा.’
बादशहाने बिरबलकडे बघितले आणि स्मितहास्य करीत बोलले ‘हे बघ, बिरबल तुझ्यासमोर रोज नवीन आव्हान असतात, आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी.’
‘हे तर खूपच सोपे आहे, महाराज.’ बिरबल बोलला. ‘हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे’, असे म्हणत बिरबलने बरणी उचलली व तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले. बिरबल बागेत गेला व तिथे त्याने एका आंब्याच्या झाडाच्या सभोवताली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरविले.
‘हे तुम्ही काय केले?’ एका दरबाऱ्याने विचारले.
‘याचे उत्तर तुम्हाला उदया मिळेल.’ बिरबल बोलला.
दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोचले, तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपापल्या वारूळात गेल्या होत्या, काही मुंग्या अजूनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या.
‘परंतु सगळी साखर कुठे बरे गेली?’ दरबाऱ्याने विचारले.
‘मातीपासून वेगळी झाली.’ बिरबल बोलला.
सर्व हसायला लागले.
बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगितले, ‘जर तुम्हाला साखर पाहिजे असेल, तर मुंग्यांच्या वारूळात जाऊन बघा.’ सर्वजण जोरात हसायला लागले.

लहान काठी

एके दिवशी अकबर आणि बिरबल बागेत फेरफटका मारत होते. बिरबल एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता. अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता. अचानक अकबरला बांबूचा एक तुकडा जमीनीवर पडलेला सापडला. त्याला बिरबलची परीक्षा घ्यायची एक युक्ती सुचली. त्याने तो बांबूचा तुकडा बिरबलला दाखवला व त्याला म्हणाला ‘तू या काठीला न कापता लहान करू शकतो का? ’

बिरबलने गोष्ट सांगायची थांबविली व अकबरच्या डोळयात बघितले. अकबर त्याच्याकडे बघून हसला. बिरबलला समजले की अकबर गंमत करण्याच्या मूडमध्ये आहे. तरीही एका विचित्र प्रश्नाचे उत्तर हे तितकेच विचित्र असते. बिरबलने आपल्या आसपास बघितले. त्याने एक बागकाम करणाऱ्याला फिरताना बघितले ज्याच्या हातात एक मोठी बांबूची काठी होती. बिरबलने त्याला शांत रहाण्यास सांगितले.

तो बागकाम करणारा जवळ आला तेव्हा बिरबलने त्याच्या हातातील काठी घेतली व ती उजव्या हातात पकडली. त्यानंतर त्याने महाराजांच्या हातातील काठी घेतली व ती आपल्या डाव्या हातात पकडली.

‘आता कृपया या दोन्ही काठयांकडे बघा.’बिरबलने अकबरला सांगितले, ‘तुमची काठी लहान दिसत आहे. मी हिला कापले देखील नाही, तरीसुध्दा ती लहान दिसते आहे. कारण, मी बागकाम करणाऱ्याच्या हातातील काठी तुमच्या काठीसमोर पकडली आहे जी तुमच्या काठीपेक्षा मोठी आहे.’
बिरबलच्या या युक्तीवर बादशहा अकबर खूष झाला.

सर्वात मोठे शस्त्र

बादशहा अकबर आणि बिरबल मध्ये कधी कधी अशा गोष्टींवरही चर्चा होत असे की ज्याची कसोटी घेताना जिवाचा धोका उद्भवत असे. एकदा अकबरने बिरबलला विचारले – ‘बिरबल, जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे?’
‘महाराज जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे.’ बिरबलने उत्तर दिले.
अकबरने बिरबलचे हे उत्तर ऐकून आपल्या मनात ठेवले व एखादया वेळी आपण याची परीक्षा घेऊ असे ठरविले.
एक दिवशी, एक हत्ती वेडा झाला. अशा स्थितीत त्या हत्तीला बेडयांमध्ये अडकवून ठेवले जात असे.


अकबरने बिरबलच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलवणे पाठवले व इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल, तसा तू या हत्तीच्या बेडया काढून टाक.
बिरबलला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती. जेव्हा बिरबल अकबरला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला. बिरबल आपल्या स्वतःच्याच धुंदीत चालत होता की त्याची नजर त्या वेडया हत्तीकडे गेली जो उडया मारत त्याच्याकडे येत होता.


बिरबल हजर जबाबी, अतिशय बुध्दिमान, चतुर व आत्मविश्वासी होता. त्याला लगेच लक्षात आले की अकबरने माझ्या आत्मविश्वासाची व बुध्दिची परीक्षा घेण्यासाठी त्या वेडया हत्तीला माझ्यावर सोडले आहे.
तो हत्ती सोंड वर करून खूप जोरात बिरबलच्या दिशेने पळत येत होता. बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळून सुध्दा वाचणे शक्य नव्हते. त्याच वेळेला बिरबलला एक कुत्रा दिसला. हत्ती खूप जवळ आला होता. तो इतक्या जवळ होता की कोणत्याही क्षणी बिरबलला आपल्या सोंडेत पकडले असते.


तेव्हा बिरबलने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरवून हत्तीच्या दिशेने फेकले. अत्यंत घाबरलेला व ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीवर जाऊन आपटला तेव्हा तेव्हा त्याचे ते भयानक किंचाळणे व ओरडणे ऐकून हत्ती पण घाबरला व वळून दुसऱ्या दिशेला पळाला.
अकबरला जेव्हा बिरबलने केलेल्या या कृत्याची बातमी मिळाली तेव्हा अकबर ला मानावेच लागले की बिरबल जे काही बोलला ते अगदी योग्य आहे. आत्मविश्वासच सर्वात मोठे शस्त्र आहे.

मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आठवणीने भेट दया…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Stories In Marathi | 20+ मराठी बोधकथा | Short Stories with Moral for Kids

इंटरनेट म्हणजे काय आणि त्याचे महत्व | What is internet ?

Leave a Comment